भंडारा : बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर मित्रांसोबत सेलिब्रेशन करायला गेलेल्या युवकाचा वैनगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील माडगी रेल्वे पुलाखाली ही घटना उघडकीस आली. निखिल बालगोटे असं मृत मुलाचं नाव असून तो 17 वर्षांचा होता. निखिल बालगोटे हा तुमसर शहरातील राहणारा आहे. 


राज्याच्या बारावीचा निकाल बुधवारी (8 जून) जाहीर झाला. मृत निखिल बालगोटेला 57 टक्के गुण मिळाले होते. निकालात पास झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निखिल तीन मित्रांसह माडगी इथल्या वैनगंगा नदी पात्राजवळ सेलिब्रेशन करायला गेला होता. दरम्यान त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. पाण्यात उड्या मारुन पोहण्याचा मनोसोक्त आनंद घेतला. परंतु या दरम्यान नदीपात्रातील खड्ड्यांमुळे त्याच्या तोल जाऊन तो नदीत बुडाला. त्याच्या दोन मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी नागरिकांना पाचारण केलं खरं मात्र निखिलचा मृतदेह वाहून गेला होता. 


या घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाठून नदीपात्रात मृत निखिलचा शोध सुरु केला. सुमारे एक ते दीड तासानंतर त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालय इथे पाठवण्यात आला आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करत आहेत. बारावीच्या परीक्षेत पास झालेला निखिल बालगोटे दुर्देवाने जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. मागील वर्षी म्हणजे 2021 मधे कोरोनामुळे बारावीची परीक्षा न होता अंतर्गत मुल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले होते. तर त्याच्या आधीच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 90.66 टक्के लागला होता. तर यावर्षीचा निकाल 94.22 टक्के आहे. म्हणजे मागील वेळेपेक्षा यावर्षी बारावीचा निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा आहे. याशिवाय यंदा निकालात मुलींनी बाजी मारली. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी 95.24 टक्के आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.