भंडारा : वर्चस्वाच्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी इथल्या युवराज बीअर बारमध्ये घडली. विशेष म्हणजे हल्लेखोर तरुणांनी स्वत: मोहाडी ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली. दिनेश मारबते (रा.मोहाडी) असं जखमीचं नाव आहे. तर सचिन मेहर आणि महेश चिंधालोरे अशी आरोपींची नावं आहेत. जखमीला भंडारा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.


दिनेश मारबते हा तरुण संध्याकाळी मोहाडी इथल्या युवराज बीअर बारमध्ये गेला होता. त्याठिकाणी आरोपी सचिन मेहर आणि महेश चिंधालोरे पोहोचले. वर्चस्वाच्या लढाईत त्यांच्यात वाद झाला आणि या वादातून सचिन आणि महेशने आपल्यासोबत आणलेल्या धारदार शस्त्राने दिनेशवर वार केले. यात त्याच्या मानेला आणि चेहऱ्याला जबर दुखापत झाली आहे. दिनेशला जखमी अवस्थेत तात्काळ मोहाडी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. त्यांतर त्याला भंडारा इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. गंभीर जखमी झाल्याने दिनेशची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.


दरम्यान या घटनेतील जखमी आणि हल्लेखोर दोन्हीही गुंड प्रवृत्तीचे असल्याचं सांगण्यात आलं आहं. हल्ला केल्यानंतर सचिन मेहर आणि महेश चिंधालोरे थेट मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि आपण हल्ला केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून जखमीच्या जबाबानंतर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेचा पुढील तपास मोहाडी पोलीस करत आहेत.


इतर बातम्या