Bhandara Agriculture News:   आधुनिक (Modern) तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना उच्च शिक्षित होणे गरजेचे आहे, किंबहुना त्यातूनच आर्थिक प्रगती साधता येतं अशी भावना सर्वांची आहे. मात्र, भंडाऱ्यातील (Bhandara) एका शेतकऱ्याच्या प्रगतीच्या वाटेत त्यांचं कमी शिक्षण कधीच आडवं आलं नाही. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील निलज या छोट्याशा गावातील नरेश रामचंद्र ढोक. अगदी दहावी पर्यंत शिकल्यानंतर त्यांनी वडिलोपार्जित दहा एकर शेतीत लक्ष द्यायला सुरुवात केली आणि शिक्षणापासून दूर राहिले.


आधुनिक शेतीचा अवलंब


वडिलांसोबत शेतीतील सर्व बारकावे शिकल्यानंतर त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेवून शेती आधुनिक पद्धतीनं करायचं ठरवलं. यासाठी त्यांनी कृषी विभागाकडून पॉली हाऊस, सेड नेट, पॅक हाऊस, ठिबक सिंचन, पाणी आणि खत नियोजनासाठी ऑटोमेशन स्वयंचलीत यंत्रणा बसवून शेती करीत आहेत. वडिलोपार्जित सात एकर शेतीत त्यांनी सुरुवातीला पारंपरिक भात पीक घेण्या ऐवजी नवीन काहीतरी लावून आर्थिक प्रगती साधायचं ठरवलं आणि भाजीपाल्याची शेती करण्यास सुरुवात केली. 


सुरुवातीच्या काही वर्षानंतर त्यांनी गावातील काही व्यक्तींची 15 एकर शेती भाडे तत्वावर घेत तिथेही भाजीपाला उत्पादन घेत प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकलं. दहावी पर्यंत जेमतेम शिक्षण झाले असले तरी, नरेश ढोक यांच्याकडून जवळपास 30 हजार शेतकरी मार्गदर्शन घेतात. त्यांच्या पालेभाज्यांचा दर्जा बघता फोनवर रोपांची ऑर्डर देखील त्यांना दिली जाते.  यातून नरेश यांना वर्षाला 15 लाखांचा नफा होत आहे. त्यांची ही प्रगती शेती पिकत नाही म्हणून नैराश्येत जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणारी आहे. 


वडिलोपार्जित 10 एकर शेतीतून साधलेल्या प्रगतीतून नरेश यांनी आता स्वतःची 7 एकर शेती विकत घेतली. त्यानंतर स्वतःची 17 एकर आणि 15 एकर भाडे तत्वावर घेतलेल्या शेतीत त्यांनी धान, कारली, टोमॅटो, मिरची, वांगे, फुलकोबी, शिमला मिरची सह पालेभाजी यांची शेती करून आर्थिक प्रगती साधली. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी देखील मोलाची साथ दिली.


त्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला भंडारा, नागपूर, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात पुरवण्यात येतो. सध्या नरेश हे  भाजीपाला उत्पादनापेक्षा भाजीपाल्यांच्या नर्सरिकडं लक्ष दिलं आहे. दर्जेदार नर्सरी असल्यानं नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यातील सुमारे 30 हजार शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. रोपांच्या नर्सरीवर नरेश यांना वर्षाला जवळपास 30 लाखांचा खर्च येतो आणि त्यातून सुमारे 15 लाखांचा नफा त्यांना मिळत आहे.