भंडारा (Bhandara) : अपघातात मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला (Honey Bee Attack) केला. यात 200 नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येणाऱ्या बाम्हणी या गावातील स्मशानभूमीत ही घटना घडली. ही घटना रविवारी (24 सप्टेंबर) रात्री समोर आली. 


अपघातात तरुणाचा मृत्यू


शुभम भोयर याचा रस्ता अपघातात शनिवारी (23 सप्टेंबर) रात्री मृत्यू झाला होता. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शुभम भोयर आणि मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला होता. त्याच्यावर बाम्हणी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्याची अंत्ययात्रा बाम्हणी इथे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील स्मशान घाटावर गेली.


प्रेत सोडून नागरिक जीव मुठीत सैरावैरा पळाले


परंतु याचवेळी मधमाशांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सहभागी झालेले नागरिक बिथरले. त्यांना काय करावं हे कळलं नाही. शेवटी नागरिक प्रेत तिथेच सोडून जीव मुठीत घेऊन सैरावैरा शेतात आणि मिळेल त्या भागात पळाले. काही नागरिक गावाच्या दिशेने दुचाकीने तर काही जण धावत सुटले. काहींनी तर, नदीच्या पात्रात उडी घेऊन मधमाशांच्या हल्ल्यातून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. 


200 नागरिक किरकोळ जखमी


परंतु मधमाशांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान 200 नागरिक किरकोळ जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमी नागरिकांनी नदीच्या पैलतिरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर खासगी रुग्णालय गाठून तिथे उपचार घेतले आणि त्यानंतर घरी परतले. परंतु या हल्ल्यामुळे नागरिकांची चांगली दमछाक झाली. 


पुण्यात गणपती विसर्जनादरम्यान मधमाशांचा हल्ला


पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरणाच्या पाण्यात विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. हिर्डोशी‌ इथल्या स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी धरणाच्यापाण्याजवळ आरती करत असताना मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला केला. यावेळी लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा एकूण 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. त्यानंतर झालेल्या पळापळीत शेवटी गणपती विसर्जन न करताच निघून जाण्याची नागरिकांवर वेळ आली. नंतर हिर्डोशी इथल्या काही ग्रामस्थांनी धरणाच्या पाण्याशेजारी असलेल्या त्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन केलं. 


हेही वाचा


Honey bee Attack : पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; सिंहगड किल्ल्यावरील घटना; वनविभागाकडून खबरदारीचा सल्ला