भंडारा:  नवजात बाळाच्या मातेच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचं सांगत नातेवाईकांनी भंडारा (Bhandara) जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीपर्यंत धिंगाणा घातला. या प्रकरणी नातेवाईकांनी भंडारा पोलिसात (Bhandara Police)  तक्रार दाखल केली असून मातेच्या मृत्यूला जबाबदार डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करु, असं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी लेखी स्वरुपात दिली. त्यानंतर नातेवाईकांचा रोष कमी झाला आणि मध्यरात्री मृतदेह रुग्णालयासमोरुन उचलत अंत्यविधीसाठी गावाला नेला.


भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील टाकली भोसा येथील प्रतीक्षा अनिकेत उके (22)   प्रसूतीसाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 29 नोव्हेंबरला दाखल केलं होतं. प्रतिक्षाची प्रसुती 30 नोव्हेंबरला झाली आणि तिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, त्यानंतर मातेची प्रकृती अचानक खालावल्यानं तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान तिचा सोमवारला दुपारी नागपूर येथे  मृत्यू झाला. नवजात बाळाच्या मातेच्या मृत्यूला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचा रोष मनात बाळगून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह असलेली रुग्णवाहिका थेट भंडारा जिल्हा रुग्णालयात आणली. रुग्णालयासमोर मृतदेह ठेवून संतप्त नातेवाईकांनी मध्यरात्रीपर्यंत अक्षरश: धिंगाणा घातला. 


भंडारा पोलिसात तक्रार दाखल


दरम्यान, नवजात बाळाच्या मातेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर फौजदारी कारवाई करावी, अशा मागणीची तक्रार भंडारा पोलिसात दाखल करण्यात आली. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम यांनी लेखी स्वरूपात दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांचा रोष कमी झाला.  मध्यरात्री मृतदेह रुग्णालयासमोरून उचलत अंत्यविधीसाठी गावाला नेला. प्रकरण निवळण्यात भंडारा आणि वरठी ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.  


बुलढाण्यात धक्कादायक प्रकार 


रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसल्याची अनेक उदाहरणं नेहमीच चर्चेत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके घालण्यासाठी भरती करण्यात आलं होतं. तिचा नैसर्गिक गर्भपात होऊ नये यासाठी या महिलेला उपचार करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आल्यानं तिचा गर्भपात होऊन बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.


हे ही वाचा :


गर्भपिशवीला टाके घालण्यासाठी रुग्णालयात दाखल, मात्र चुकून गर्भपाताच्याच गोळ्या दिल्या, ढिसाळ कारभारानं संताप