Bhandara News: भंडाऱ्यात (Bhandara Crime) घडलेल्या एका घटनेनं सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर चौदाव्याच्या दिवशी आईनं त्यांच्या फोटोला घालायला हार आणला नाही, याचा राग मनात धरून मुलानं थेट आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. भंडारा जिल्ह्यातील डोंगरगाव (Dongargaon) गावात ही घटना घडली. घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला आहे. तसेच, चौदा दिवसांपूर्वी वडिलांचा मृत्यू आणि त्यानंतर लगेचच मुलानं आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या चौदा दिवसातच एका माऊलीच्या नशीबात आपल्या पोटच्या मुलाचा मृत्यू पाहावा लागला. भंडाऱ्यातील डोंगरगावात ही दुर्दैवी घटना घडली. डोंगरगावात राहणाऱ्या एका महिलेच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर निधनानंतरचे विधी सुरू होते. महिलेच्या पतीचा चौदावा होता. चौदाव्याचे सर्व विधी सुरू असतानाच मयत पतीच्या फोटोसाठी तिनं हार आणला नव्हता. आईनं वडिलांच्या चौदाव्याच्या दिवशी त्यांच्या फोटोला घालण्यासाठी हार न आणल्यामुळे महिलेच्या 22 वर्षीय मुलाला राग आला. भर कार्यक्रमात त्यानं आपला राग व्यक्तही केला. पण तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्यानं याच गोष्टीचा राग मनात ठेवला. 22 वर्षीय रंजीत विजयपाल वासनिकला आपल्या आईवरचा राग अनावर झाला. 


आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फोटोसाठी साधा हार न आणल्यामुळे रंजीत संतापला आणि हाच राग मनात ठेवून त्यानं टोकाचं पाऊल उचललं. गावालगत असलेल्या तलावात उडी घेऊन 22 वर्षांच्या रंजीतनं आत्महत्या केली. रंजीतनं तलावात उडी घेतल्याची माहिती मिळताच संपूर्ण गाव तलावाजवळ पोहोचला आणि रंजीतचा शोध सुरू करण्यात आला. तब्बल 11 तासांच्या शोध मोहिमेनंतर स्थानिकांच्या हाती रंजीतचा मृतदेह लागला. 


चौदा दिवसांपूर्वी पतीचा मृत्यू आणि त्यानंतर क्षुल्लक कारणावरुन तरुणानं केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, पंधरा दिवसांच्या आतच पती आणि हाताशी आलेला मुलगा गमावल्यानं महिलेसह वासनिक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाची माहिती घेऊन अधिक तपास सुरू केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


धाराशिव हादरलं! मेडिकल चालकाकडून तब्बल 19 हजारांवर नशेच्या गोळ्यांची विक्री; अन्न औषध प्रशासन विभागाच्या कारवाईनंतर खळबळ