Silk Farming : राज्यात सर्वाधिक रेशीम कोष निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यामध्ये रेशीमला विक्रमी भाव मिळत आहे. पांढऱ्या रेशीम कोषाला तब्बल पाच हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय. विशेष म्हणजे बीडच्या बाजार समितीमध्ये दिवसाला सात ते आठ टन रेशीम कोषाची खरेदी करण्यात येते. या खरेदी केंद्रावर बीड जिल्ह्यातीलच नाही, तर शेजारील जालना परभणी जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा रेशीम कोष विक्री करण्यासाठी आणत आहेत. त्यामुळे मागच्या अनेक महिन्यांमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अच्छे दिन आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बीडमध्ये असलेल्या बाजार समितीच्या रेशीम खरेदी केंद्रावर फक्त बीडच नव्हे, तर इतर जिल्ह्यातले शेतकरी देखील रेशीमची विक्री करण्यासाठी येत आहेत. तीन महिन्यापूर्वी बीडच्या बाजार समितीमध्ये नवीन संचालक मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बंद पडलेलं रेशीम खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना इतर ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात रेशीम विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे.
दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतीचे सतत होत असलेले नुकसान लक्षात घेता बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आता रेशीम शेतीची कास धरली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हा रेशीम शेतीच हब ठरत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना रेशीमची विक्री करण्यासाठी जालना किंवा बेंगलोरच्या रामनगर या मार्केटमध्ये जावं लागायच. त्यामुळे त्यांचा वाहतुकीचा खर्च जास्त होत होता.पण, आता बीडमध्येच रेशीम खरेदीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तर, या ठिकाणी रेशीम कोषाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांमध्ये रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे.
रेशीम कोषाची प्रक्रिया उद्योगही उभारणार...
सध्या मराठवाड्यात असलेल्या रेशीम खरेदी केंद्रापैकी बीड मधल्या रेशीम खरेदी केंद्रावर सर्वाधिक रेशीमची खरेदी केली जात आहे. एका दिवसाला इथे अंदाजे सात टन रेशीम कोषाची खरेदी केली जात असून, बीडसह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी देखील या ठिकाणी रेशीम विक्रीसाठी येत आहेत. तर, दुसरीकडे लवकरच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रेशीम कोषाची प्रक्रिया उद्योग देखील बाजार समितीच्या वतीने उभा करण्यात येणार आहे.
फसवणूक टळणार...
पूर्वी बीड जिल्ह्यातले शेतकरी हे बेंगलोरच्या रामनगर मार्केट किंवा जालना या ठिकाणी रेशीम कोषाची विक्री करायचे. मात्र, विक्री केल्यानंतरही त्यांना एक ते दोन महिन्यानंतर पैसे मिळायचे. तर, कधीकधी व्यापाऱ्यांकडून या शेतकऱ्यांची फसवणूक देखील केली जायची. मात्र, आता बीडमध्ये हक्काची बाजारपेठ निर्माण झालं आहे. या ठिकाणी 40 ते 50 हजार रुपये क्विंटलचा भाव रेशीमला मिळत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: