Farmer Success Stories : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात शेतकरी दरवर्षी कापूस, तूर हे पारंपारिक पिके घेत आहेत. मात्र, पैठण तालुक्यातील हर्षी हे असे गाव आहे की, या गावात प्रथमच सर्व शेतकऱ्यांनी (Farmer) एकजुटीने कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून मिरचीची लागवड केली आहे. मागील वर्षी अतिवृष्टीच्या पावसाने कपाशीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र त्यावेळी गावातील दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कपाशीत लावलेल्या मिरचीच्या अंतरपिकांची लागवड करुन चांगला नगदी नफा देखील मिळवला होता. त्यामुळे यंदा या गावात संपूर्ण शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांचा अधिकाधिक पारंपारिक पिकांवर भर असल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, आता अनेक शेतकरी आता या पारंपरिक पिकांना फाटा देत वेगळे प्रयोग करत आहेत. त्यामुळे योग्य पिकाची निवड, योग्य व्यवस्थापन या सर्वांची सांगड घालून नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. असाच काही प्रयोग हर्षीतील शेतकऱ्यांनी करत, आधुनिक शेतीची कास धरुन अंतरपिकांतून आर्थिक प्रगती केली आहे.
पैठण तालुक्यातील हर्षी या गावात 1 हजार एकर शेतीवर मिरचीची अंतरपीक म्हणून लागवड करण्यात आली आहे. गावातील प्रत्येक शेतात कमीत एकर क्षेत्रात मिरचीची लागवड करुन, मिरचीतूनच प्रत्येकांने एकरी दोन लाख रुपयांपर्यत नफा मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचे चित्र आहे. मिरची लागवडीतून इतका नफा मिळवू शकतो यावर शेतकऱ्यांचा विश्वास देखील बसणार नाही, पण हे खरे आहे.
एकरी दोन लाखांचा फायदा...
दरवर्षी शेतकरी कपासी, तूर, मूग, बाजरी ही पिके घेतात. मात्र, कधी अतिवृष्टीचा फटका तर कधी कोरडा दुष्काळ पडतो. त्यामुळेच शेतकरी हवालदिल होत असतो. मात्र, हर्षीतील शेतकऱ्यांनी कपाशीच्या पिकांत नगदी पिकाची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि मिरची या पिकाची लागवड केली. सर्व शेतकऱ्यांने घरगुती रोपे तयार करुन जुलै महिन्यात कपाशी ठिबक सिंचनच्या मधोमध लावून दिली होती. ज्यातून एकरी प्रत्येक शेतकऱ्याने दोन लाख रुपये कमावले आहेत.
गावातच येतात व्यापारी...
संपूर्ण गावाने एकूण 1 हजार एकर क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली आहे. गेल्या चार महीन्यापासून येथील शेतकऱ्यांचे दिड ते दोन टन मिरची प्रतिदिन पुणे, अहमदनगर येथील बाजारपेठेत जाते. विशेष म्हणजे, शेतकरी व्यापाऱ्यांकडे मिरची विक्री करण्यासाठी जात नाही. तर व्यापारीच दररोज संध्याकाळी गावात येऊन दिवसभर तोडणी झालेली मिरची 85 ते 90 रुपये किलोप्रमाणे खरेदी करून घेऊन जात आहे. गावातील प्रत्येकांनी मिरची लागवड केली असल्यामुळे गावातील महिलांच्या हाताला रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे. एका एकरातील मिरची तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडे 10 ते 12 कामगार प्रतिदिन काम करत आहे
मिरचीच्या रोपांना कपाशीच्या झाडांचा आधार मिळतो
हर्षी येथील शेतकऱ्यांनी मिरचीचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले त्यामुळे मिरची पिकाची उंची साधारणतः चार ते साडेचार फूट आहे. तोडणी सुरु असताना हिरव्या मिरच्या तोडून घेतल्यानंतर त्याचसोबत लाल मिरची देखील तोडून घेतली जाते. मिरच्यांचे झाडांची उंची जास्त आहे. मात्र, अंतरपीक असल्याने मिरचीच्या रोपांना कपासीच्या झाडांचा आधार मिळतो. त्यामुळे रोपे खाली पडत नाहीत आणि हवा देखील खेळती राहते. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
यशोगाथा! पारंपरिक पिकांना फाटा देत फुलवली गुलाबाची शेती; महिन्याला लाखोंची कमाई