Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस, त्याच्यावर अनेक गुन्हे, अटक झालीच पाहिजे: संदीप क्षीरसागर
Santosh Deshmukh Murder: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीप्रमाणे बीड जिल्हा दत्तक घ्यावा आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करावा, असंही क्षारसागर यांनी पुढे म्हटलं आहे.
बीड: बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांना अटक करण्याची मागणी केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. संदीप क्षीरसागर बोलताना म्हणाले, बीड प्रकरणावरती आज पहिली चर्चा आहे आणि वाल्मीक कराडला अटक केली पाहिजे. वाल्मीक कराडला राजकीय पाठींबा आहे. धनंजय मुंडे यांच्या जवळचे ते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीप्रमाणे बीड जिल्हा दत्तक घ्यावा आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करावा. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मागे काय कारण आहे हे वाल्मीक कराड याला अटक केल्यावर स्पष्ट होईल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. (Santosh Deshmukh Murder)
संदीप क्षीरसागर यांची वाल्मीक कराडला अटक करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मीक कराड यांना अटक करण्याची मागणी केली आहे. वाल्मीक कराड यांना राजकीय पाठिंबा आहे आणि ते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत, मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली प्रमाणे बीड जिल्हा दत्तक घ्यावा आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करावी, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.(Santosh Deshmukh Murder)
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जो मास्टर माईंड आहे वाल्मीक कराड त्याला अटक झाली पाहिजे. अजून पर्यंत तो मोकळा फिरत आहे. त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल आहे. राज्यात वातावरण पेटत असताना देखील त्यांना अटक केली जात नाहीये, ते मोकळे फिरत आहेत. वाल्मीक कराड यांच्या मागे मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे आहेत. बीड जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. फक्त काही लोकांमुळे जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची वेळ आली आहे. बीड मधील लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वाल्मीक कराड यांना कधी अटक केली जाते आणि कधी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातोय आणि त्यांना अटक केली जाते याची वाट आम्ही सर्वजण पाहत आहेत, त्यांना अटक करा हीच आम्हा सर्वांची मागणी आहे, संदीप क्षीरसागर यांनी पुढे म्हटले आहे. (Santosh Deshmukh Murder)
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता हा मुद्दा राज्यासह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गाजताना दिसत आहेत.
शरद पवार संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार 21 तारखेला शनिवारी बीड दौऱ्यावर असणार आहेत. शरद पवार मस्साजोग गावी जाऊन मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. 10 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणार अशी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे.