Santosh Deshmukh : वाल्मिक कराडची जेलवारी, संतोष देशमुख प्रकरणाचा पुढचा तपास आता कोठडीत
Santosh Deshmukh Murder Case : न्य़ायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकिल जामिनासाठी कोर्टात गेले तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपी जामीन मिळत नाही.
बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणाकडे साऱ्या राज्याचं बीडकडे लक्ष लागलं आहे. मकोकात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची पोलिस कोठडी आज संपली. बीड जिल्हा विशेष न्यायालयाने कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने वाल्मिक कराडला पुढचे सहा महिने जेलमध्येच रहावं लागणार आहे. तर पुरावा असलेला फोन गहाळ केल्यामुळे हत्येतील आरोपी विष्णू चाटेवर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरपंच हत्या प्रकरणात कोर्टात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. मकोका आरोपी वाल्मिक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने कोर्टात हजर करण्यात आलं. एसआयटीने चौकशीत काय-काय बाबी शिल्लक आहेत हे सांगितलं. पोलिसांचं म्हणणं ऐकून घेत बीड कोर्टाने कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. पुन्हा गरज पडली तर चौकशीसाठी पोलिस कोठडी मिळण्याचा पोलिसांचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला.
आणि कराडची रवानगी बीड जिल्हा कारागृहात करण्यात आली.
न्यायालयीन कोठडीचे आता अर्थ काय?
वाल्मिक कराडची आता जेलमध्ये रवानगी होणार. सात दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा विषेश न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता इथून पुढे कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे.
न्य़ायालयीन कोठडी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडचे वकिल जामिनासाठी कोर्टात गेले तरी मकोका अंतर्गत कारवाईत किमान 180 दिवस आरोपी जामीन मिळत नाही. त्यामुळे किमान पुढचे सहा महिने वाल्मिक कराडला जेलमध्येच रहावं लागणार आहे.
कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीला ज्या ज्या वेळी तपासासाठी वाल्मिक कराडची गरज असेल त्या त्यावेळी कोर्टाच्या परवानगीने सीआयडी कराडची चौकशी करु शकते.
विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्य़ा प्रकरणात वाल्मिक कराडची पोलिस कोठडीची गरज असल्याने सीआयडी कोर्टाकडे पुन्हा पोलिस कस्टडीची मागणी करु शकतात.
विष्णू चाटेवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम-1999 म्हणजे मकोका कलम 18 नुसार कराडसह सर्व आरोपींचे जबाब नोंदविण्यात आले.आरोपी विष्णू महादेव चाटे याच्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात महत्वाचा पुरावा होता चाटेचा मोबाईल. त्याच फोनवरुन कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितल्याचा आरोप आहे. फरार असताना हा फोन गहाळ केल्याने विष्णू चाटेवर आणखी एक कलम वाढविण्यात आले आहे. विरोधकांनी मात्र तपास नीट होत नसल्याचा आरोप पुन्हा केला आहे.
बीड प्रकरणात अजूनही तपास नीट होत नाही. अजूनही एक आरोपी फरार आहे. एकही आरोपी सुटणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला तर तपास व्यवस्थित सुरु असून न्यूजसाठी नको ते आरोप केले जात आहेत अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.
सरपंच देशमुख यांची हत्या दुर्देवी कोणी असेल कराड असेल कोणी सुटणार नाही. फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
धनंजय मुंडे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "मी याबाबतीत काहीही उत्तर देणार नाही कृपा करून मला याबाबत प्रश्न विचारू नका. मी स्पष्ट सांगितले आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत. ज्यांनी निर्घृण पणे हत्या केली त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. कुणी काय म्हणाव हा विषय वेगळा आहे. मात्र न्यूज व्हॅल्यू करायची पोलीस व्यवस्थित तपास करत आहे."
याबाबत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी त्यांचा भाऊ आणि मुलीने पंढरपुरच्या विठुरायाला साकडं सुद्धा घातलं. पंढरपुरात बोलताना धनंजय देशमुख यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भेटीसाठी आले नाहीत याबाबत खंत व्यक्त केली. दोनच दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी यावरुन स्पष्टीकरणंही दिलं होतं.
कारागृहात नवीन कैद्यांसाठी असलेल्या बराकीत वाल्मिक कराडचा आज मुक्काम असेल. उद्या गुन्ह्यानुसार कोणत्या बराकीत ठेवायचं ते ठरेल. गरज पडली तर मकोका अंतर्गत 30 दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते. त्यासाठी येत्या 14 दिवसात तपासाला वेग आणण्याचं आणि फरार आरोपीला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल.
ही बातमी वाचा :