पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना भाजपाने बीडची (Beed) उमेदवारी दिलीय. त्यामुळे त्या बीड जिल्ह्यात पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. बीड जिल्ह्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार (Maha Vikas Aghadi) अद्याप ठरलेला नाही. मात्र महाविकास आघाडीतर्फे येथून मराठा उमेदवाराला तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा (OBC Vs  Maratha) अशी लढत पाहायला मिळू शकते. यावरच पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी आज (21 मार्च) पुण्यात जाऊन भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पंकजा मुंडे काय म्हणाल्या? 


मी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात जात आहे. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारांची मी भेट घेत आहे. त्याचाच भाग म्हणून मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देण्यासाठी मी पुण्यात आले आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.


माझा प्रत्येक जाती-धर्माशी संबंध


मनोज जरांगे यांच्या रुपात बीडमध्ये मराठा समाजाचं नवं नेतृत्व उभं राहिलेलं आहे. मनोज जरांगेंनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे बीडमधील मराठा समाज एकजुट झाला आहे. ही स्थिती लक्षात घेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्योती मेटे यांना तिकीट देण्याचा विचार केला जातोय. हाच धाका पकडत बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होणार का? असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना, बीड जिल्हा हा पुढारलेला आहे. बीड जिल्ह्याने वेगवेगळ्या समाजातील खासदार निवडून दिलेले आहेत. बीडने अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांनी निवडून दिलेलं आहे. बीड जिल्ह्यातील मतदार हे विकासच्या मुद्द्यावरच मतदान करतो. मी २२ वर्षांपासून राजकारणात आहे. मी बीडची पालकमंत्री राहिलेली आहे. माझा प्रत्येक गावाशी संबंध आलेला आहे.  माझा प्रत्येक जाती-धर्माशी संबंध राहिलेला आहे. माझी कोणाशीही कटुता नाही. कोणाला कटुता वाटेल, असं मी कधीही वागलेली नाही. माझं सर्वसमावेशक धोरण राहिलेलं आहे. मी माझ्याविरोधातील उमेदवाराला फक्त प्रतिस्पर्धी म्हणून पाहते. मी त्याला अमूक जातीचा उमेदवार म्हणून पाहात नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.  


17 वर्षांची आहे तेव्हापासून....



पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातच अडकवून राहाव्यात यासाठी महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जातोय का? असा प्रश्न पंकजा मुंडेंना विचारण्यात आला. याला उत्तर देताना मुंडे म्हणाल्या की, सध्या मी लोकसभेच्या उमेदवारीकडे पूर्णपणे लक्ष दिलं आहे. लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी नवी नाही. 2004 सालापासून मी काम करतेय. ही पाचवी निवडणूक आहे. मी 17 वर्षांची असताना तेव्हाच्या खासदार रजनीताईंबरोबर प्रचार केला होता, असा राजकीय इतिहासाचा दाखलाही मुंडे यांनी दिला.  



बीडमध्ये मविआकडून कोणाला उमेदवारी? 


पंकजा मुंडे यांचा सामना करू शकेल अशा तुल्यबळ उमेदवाराचा महाविकास आघाडीकडून शोध घेतला जात आहे. यासाठी प्रामुख्याने बजरंग सोनवणे यांचा विचार केला जातोय. ते शरद पवार यांच्या राष्ट्रावदीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत नेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचाही विचार केला जातोय. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न चालू आहेत. पंकजा मुंडे यांच्याविरोधात ज्योती मेटे यांनादेखील तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.