Marathwada Heavy Rain: मराठवाड्यासाठी सलग पाच दिवस धोक्याचे; हवामान खात्याचा अलर्ट, दुष्काळी पट्ट्यात इतका पाऊस का झाला, समोर आलं कारण
Marathwada Heavy Rain: बंगालच्या उपसागरात ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्याचा प्रवास पश्चिमेकडे झाला. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या आजुबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाला आहे.

पुणे: राज्यभरात पावसाने हाहाकार (Heavy Rain) माजवला आहे, अनेक ठिकाणी जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालेलं आहे. अशातच मराठवाड्यावर अस्मानी संकट अधिक गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, चक्रीय स्थितीमुळे राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे.राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आहे. विदर्भात २७ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain)पडू शकतो, तर काही भागांत आजच अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात २९ सप्टेंबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून, विशेषत: उद्या २७ सप्टेंबर रोजी पावसाची तीव्रता अधिक असण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढेल, तर २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान या भागांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) अपेक्षित आहे. दरम्यान, मच्छिमारांना २४ ते २९ सप्टेंबरदरम्यान समुद्रात न जाण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
Marathwada Heavy Rain: ‘एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार’ बसविण्याची घोषणा कागदावरच
मराठवाडा आता ढगफुटीप्रवण प्रदेश होत चालला आहे. २०२० नंतरच्या काळात या विभागाला तीन वेळा कमी-अधिक प्रमाणात ‘ओला दुष्काळ’ सहन करावा लागला आहे. मागील पाच वर्षांत तब्बल ४२ हून अधिक तालुक्यांतील खरीप हंगाम ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झाला आहे. यंदाही पावसाळ्यात १२ ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे २४ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, त्यापैकी जवळपास ७५ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येतो. गेल्या दहा दिवसांत रात्रीच्या वेळी झालेल्या पावसामुळे जीवितहानी आणि पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी ‘एक्स-बॅण्ड डॉप्लर रडार’ बसविण्याची घोषणा पूर्वीच करण्यात आली होती. मराठवाड्यातील हवामानाचे स्वतंत्र संशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी यासाठी जागा निश्चितही करण्यात आली होती. मात्र, हा प्रकल्प अजूनही कागदावरच असून त्याला प्रत्यक्षात मुहूर्त मिळालेला नाही.
Marathwada Heavy Rain: रात्रीतून पाऊस होण्यामागे 'डाऊनरफ्ट' हे कारण
हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा ढगफुटीचा प्रदेश होतो आहे. १२ सप्टेंबरपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रात्रीतून पाऊस झाला आहे. हिमालयाच्या बाजूला तापमान वाढले आहे. त्यामुळे ढगात पाण्याची धारणक्षमता वाढली आहे. त्याला थंडावा मिळाला, की तेथे ढगफुटीसारखा पाऊस होतो. रात्रीतून पाऊस होण्यामागे 'डाऊनरफ्ट' हे कारण आहे. दिवसा हवेतील आर्द्रता या काळात वाढल्याने बाष्पीभवन वेगाने होऊन डाऊनरफ्ट होऊन ढगफुटीसारखा ढग जमा होतात. व रात्रीतून पाऊस होतो आहे.
Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पूर का?
बंगालच्या उपसागरात ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्याचा प्रवास पश्चिमेकडे झाला. त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या आजुबाजूच्या परिसरात मोठा पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली की विदर्भासोबत मराठवाड्यात पाऊस होतो.
Marathwada Heavy Rain: अतिवृष्टीचे कारण...
१४ आणि १५ ऑगस्टनंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांत सलग पाऊस पडला. याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात एकामागोमाग एक कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. ही क्षेत्रे उत्तर पश्चिम व पश्चिम दिशेला सरकली. याचा परिणाम म्हणून विदर्भासोबत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला.
Marathwada Heavy Rain: ही ढगफुटी नव्हे, एकूणच जोरदार पाऊस झाला
मराठवाड्यात सर्वसाधारण मध्यम पाऊस असतो. मात्र, कमी दाबांच्या क्षेत्रामुळे कमी दिवसांत जास्त पडला. याला ढगफुटी म्हणता येणार नाही. ढगफुटी म्हणजे १ तासांत १०० मिलिमीटर पाऊस पडतो. मराठवाड्यात गेल्या ४५ दिवसांत मोठा पाऊस पडला असून, त्याचा परिणाम म्हणून पूरस्थिती निर्माण झाली आहे. २७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजीही बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाला अतिवृष्टी म्हणता येणार नाही किंवा तसे म्हटलेले नाही, असेही होसाळीकर यांनी सांगितले आहे.
Marathwada Heavy Rain: सलग पाच दिवसांचा 'यलो अलर्ट'; प्रशासन पूर्णपणे सतर्क
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा धोका कायम असल्याने गुरुवारपासून पुढील पाच दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शुक्रवार आणि शनिवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नागरिकांना नदी, नाले, धरण आणि तलाव परिसर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षित स्थळी जाण्यास सांगितल्यास त्वरित प्रतिसाद द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी केवळ अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा, महत्त्वाची कागदपत्रे, औषधे, अन्नसाठा आणि पिण्याचे पाणी सुरक्षित ठेवावे, असे आवाहन केले.
दरम्यान, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांनी पूरग्रस्त भागातून पायी किंवा वाहनाने जाणे जीवघेणे ठरू शकते, असा इशारा दिला. तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तातडीच्या प्रसंगी नागरिकांनी थेट जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
























