Beed Crime News : सध्या आयपीएल (IPL) सुरु असल्याने ऑनलाईन टीम लावून त्यातून पैस जिंकण्यासाठी तरुण अनेक ॲप डाऊनलोड करून संघ लावतायत. मात्र काही सायबर भामटे अशा लोकांना गंडा घालत आर्थिक फसवणूक करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, असाच काही प्रकार बीड जिल्हात (Beed District) समोर आला आहे. आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात आपण ड्रीम 11 वर लावलेली टीम अचूक ठरली असून, आपण 1 लाख रूपये जिंकले आहेत. त्याची काही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण थोडे पैसे पाठवा, असे म्हणत तब्बल 59 हजार रूपयांना एका विद्यार्थ्याला सायबर भामट्यांनी चुना लावला. ही घटना बीड तालुक्यातील एका गावात घडली असून, सायबर पोलिसांकडे अर्ज देण्यात आला आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, बीड तालुक्यातील एक विद्यार्थी दररोज आयपीएल मॅच सुरू असताना ड्रीम 11 वर टीम लावत होता. दरम्यान अनेकदा त्याला त्यातून त्याला पैसे देखील मिळत होते. 9 मे रोजी त्याला एका अनोळखी मोबाइल नंबरवरून फोन आला. आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात आपण ड्रीम 11 वर लावलेली टीम अचूक ठरली असून, तुम्ही एक लाख रूपये जिंकलात, असे म्हणून विद्यार्थ्यांचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्याच्यासोबत व्हॉट्सअॅपवर चॅटिंग केली. त्यामुळे तरुणाचा विश्वास बसला. आपण एक लाख रुपये जिंकले असल्याचा देखील विश्वास बसला. 


तुम्ही जिंकलेले पैसे तुम्हाला पाठवितो, परंतु त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यासाठी विद्यार्थ्यांकडून दोन दिवसांत 59 हजार 348 रूपये घेतले. आणखी 10 हजार रुपये मागितल्यावर विद्यार्थ्याला संशय आला. त्याने दिलेले सर्व पैसे मागितल्यावर समोरच्या भामट्याने फोन बंद केला. वारंवार संपर्क करूनही फोन न लागल्याने त्याने थेट सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनीही लगेच बँक आणि संबंधित यंत्रणेला पत्र पाठवून पैसे परत मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.


काळजी घावी...


आयपीएलच्या क्रिकेट सामन्यात ॲपवरून पैसे लावून, टीम लावणारे अनेक ॲप सध्या उपलब्ध आहेत. अनेक तरुण यावर टीम लावतात. मात्र हीच बाब लक्षात घेत सायबर भामटे अनेकांची फसवणूक करत आहेत. तुम्ही लावलेली टीम जिंकली असून, तुम्हाला लाखो रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची थाप मारली जाते. विशेष म्हणजे, फोनवरून संभाषण करून विश्वास देखील संपादन केला जातो. विशेष म्हणजे, या सायबर भामट्याच्या जाळ्यात तरुण सतत फसतात. त्यामुळे तरुणांनी अशा फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


Pune Crime news : उडता पुणे! पार्ट्या, शौक पूर्ण करण्यासाठी अंमली पदार्थांची विक्री, 1 कोटी 14 लाखांच्या LSD स्ट्रिप्स जप्त; पोलिसांनी प्लॅन कसा उधळून लावला?