Dam water Reserve in Beed: मान्सून तोंडावर असताना यावर्षी पावसाची शक्यता कमी असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यामुळे धरणात सध्या असलेल्या पाण्याचे नियोजन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे प्रशासनाने बीडच्या (Beed) माजलगाव धरणाचे पाणी आरक्षित (Dam water Reserve) करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्याला दिल्या जाणाऱ्या रोटेशनपैकी एक रोटेशन कमी करण्यात आले असून, धरणाच्या पाण्यातून उपसा करणाऱ्या मोटारींवर कारवाई करण्यात येणार आहे. मान्सून उशिरा आला किंवा पाऊस कमी पडल्यास पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 


मागील तीन वर्षांपासून परतीच्या पावसामुळे माजलगाव धरण ओव्हर फ्लो होत आहे. त्यामुळे अनेक दिवस धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले होते. परंतु, यावर्षी पावसाळ्यात कमी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. यावर्षी कडक उन्हामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी धरणाची पाणी पातळी 26 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यामुळे आता प्रशासनाने पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात धरणाखालील भागात असलेल्या शेतकऱ्यांना पिकासाठी तीन आणि उन्हाळी चार रोटेशन देण्यात येणार होते. त्यापैकी रब्बीचे तीन रोटेशन देण्यात आले, तर उन्हाळी तीनच रोटेशन देण्यात आले. मात्र एक रोटेशन रद्द करण्यात आले आहे. 


शेतकऱ्यांची चिंता वाढली...


मागील तीन वर्षांपासून धरण भरुन वाहिल्यामुळे तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात झाले आहे. पाणीपातळी खालावल्याने प्रशासनाने पाणी आरक्षित केले असून, आता धरणाच्या पाण्यावर बसवण्यात आलेल्या अवैध मोटरींवर कारवाई करुन त्या जप्त करण्यात येणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांचा ऊस वाळू लागला आहे. 


धरणात केवळ 26 टक्केच पाणीसाठा शिल्लक


धरणाची पाणी पातळी जवळपास चार मीटरने खालावली आहे. शनिवारी माजलगाव धरणाची पाणी पातळी 428.09 मीटर झाली. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी 431.80 मीटर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे सध्या धरणात एकूण पाणीसाठा 223.40 दलघमी असून, जिवंत पाणीसाठा 81.40 दलघमी आहे. त्यामुळे आता धरणात केवळ 26 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या पाण्यावर बीड आणि माजलगाव शहरासह 11 खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed Water Issue : बीडच्या अमळनेरमध्ये भीषण पाणीटंचाई, पाणीटंचाईच्या विरोधात महिला आक्रमक