Pune Crime news : शिक्षणाचं माहेर घर असलेल्या पुण्यात आता उच्चशिक्षित तरुण व्यसनाच्या आहारी जात असल्याचं चित्र आहे. पार्ट्या आणि इतर शौक पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशासाठी थेट ड्रग विक्रीचा व्यावसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी चक्क फुड डिलिव्हरी अॅपचा वापर करत असल्याचंही पोलीस तपासात पुढे आलं आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे . त्यांच्याकडून 1 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या LSD स्ट्रिप्स जप्त करण्यात आल्या आहेत.
पुण्यातील पठ्ठ्यांनी अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी नवी शक्कल लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुणे पोलिसांनी त्यांचा हा प्लॅन उघडकीस आणला आहे. पुण्यातील रस्त्यांवर अनेक डिलिव्हरी बॉय दिसतात. रात्रंदिवस ते फूड डिलिव्हरी करतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही संशयाने पहिलं जात नाही. याच सगळ्याचा फायदा एका अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळीने घेतला आहे. 24 मे आणि 25 मे रोजी पोलिसांकडून दोन कारवाया करण्यात आल्या त्यात 1 कोटी 14 लाखांचा माल पोलिसांनी जप्त केला. 24 मे रोजी 61 लाखांच्या LSD स्ट्रिप्स जप्त केल्या त्यानंतर 25 मे रोजी 53 लाखांचा माल जप्त करण्यात आला. दोन्ही दिवशी पोलिसांनी पुण्यातील वेगवेगळ्या परिसरातून या उच्चशिक्षित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
रोहन दीपक गवई (वय 24, रा. डि पी रोड, कर्वे पुतळा, कोथरुड), सुशांत काशिनाथ गायकवाड (वय 36, रा. बाणेर, मुळ कोडोली, सातारा – Satara), धीरज दीपक लालवाणी (वय 24, रा. पिंपळे सौदागर), दीपक लक्ष्मण गेहलोत (वय 25, रा. सनसिटी रोड), ओंकार रमेश पाटील (वय 25, रा.वाकड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
'law, MBA आणि इंटेरिअर डेकोरेटरचं घेतलंय शिक्षण'
सुरुवातील पोलीसांना कोथरुड परिसरात हा प्रकार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी यातील रोहन गवई याला पकडून त्यांच्याकडून 90 हजार रुपयांचे एलएसडी जप्त केले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे इतर साथीदारही असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याच्या साथीदारांना बाणेर, सिंहगड रोड, पिंपळे सौदागर, वाकड परिसरातून अटक केली आहे. महत्वाचं म्हणजे या हे पाचही जणं उच्चशिक्षित आहे. त्यांनी law, MBA आणि इंटेरिअर डेकोरेटरचं शिक्षण घेतलं आहे.
'पार्ट्यांसाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी करायचे ड्रग विक्री'
या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. या सगळ्या तरुणांना पॉर्टी आणि बाकी शौक पुरवण्यासाठी हा धंदा सुरु केल्याचं चौकशीत पुढे आलं आहे. धीरज, दीपक आणि ओंकार या यातील लिडर आहेत. व्हॉटसअॅपद्वारे संपर्क (WhatsApp) साधल्यानंतर डिलिव्हरी देण्यासाठी ते फूड अॅपद्वारे ऑर्डर बुक करत होते. त्यानंतर समोरील व्यक्तीने ऑर्डर दिल्यानंतर ते डिलिव्हरी बॉयकडे पार्सल पॅक करुन देत होते. या पार्सलमध्ये काय आहे, हे डिलिव्हरी बॉयला माहिती नसायचं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे