Farmer Suicide: एकीकडे राज्यात सत्तांतराचा गोंधळ सुरु असताना दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकरी गळ्याभोवती फास लावून आपला जीवन संपवत आहे. बीड जिल्ह्यातील गेल्या महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. कारण जून महिन्यातील 30 दिवसात 30 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्यात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करणार असल्याची घोषणा केली. पण याच दरम्यान बीड जिल्ह्यातील गेल्या सहा महिन्यातील शेतकरी आत्महत्येची आकडेवारी धडकी भरणारी आहे. 1 जानेवारी 2022 ते 30 जून 2022 पर्यंत सहा महिन्यात 181 दिवसात 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलले आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यावेळी आत्महत्यांचा आकडा 54 ने अधिक आहे. तसेच गेल्या महिन्यात 30 दिवसात 30 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे.
कोविडचा फटका...
कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांच्या छाताडावर बसले आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मुलं शहरात कामासाठी स्थलांतर करतात. मात्र कोरोना काळात आलेली बेरोजगारी आणि हातातील काम गेल्याने ही मुलं पुन्हा गावाकडे आले. मात्र परत आल्यानंतर सुद्धा गावाकडची परिस्थिती काही बदलेली नसल्याने शेतकरी कुटुंब हतबल होत आहे. त्यात घेतलेलं कर्ज कसे फेडायचं याची चिंता, त्यामुळे बळीराजा आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे.
पाऊसानेही पाठ फिरवली...
मराठवाड्यात फक्त 25 टक्के पाऊस झाला असून, अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. औरंगाबाद,जालना आणि बीड हे तीन जिल्हे सोडले तर विभागात अजूनही अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. तर अनके ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे. आधीच कर्ज काढून पिकांची लागवड केली, त्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार असल्याचे चित्र आहे.
संबंधित बातम्या
Marathwada: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस; पाच जिल्ह्यात मात्र प्रतीक्षा
Marathwada Dam: मराठवाड्यातील अकरा मोठ्या धरणात 41 टक्के पाणीसाठा;जायकवाडी 33 टक्क्यांवर