(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Crime News: आधी दोघांनी सोबत दारू पिली; त्यांनतर मुलाने पित्याची हत्या केली
Beed Crime News: आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांसोबत झालेल्या वादानंतर मुलाने त्यांची हत्या केली.
Beed Crime News: बीडच्या केज तालुक्यातील जवळबन गावात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केला आहे. हातातील कोयत्याने सपासप वारू करून या मुलाने वडीलांना संपवलं आहे. शिवाजी केशव हंकारे (वय 55, रा. जवळबन, ता. केज) असे मृताचे नाव असून पवन शिवाजी हंकारे (26) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी शिवाजी आणि पवन या दोन्ही पिता-पुत्राने गावातील दक्षिणेला असलेल्या माळावर जाऊन एकत्रित दारू पिली. यावेळी पॅकवर- पॅक सुरु होते. त्यांनतर पवन याने वडील शिवाजी यांना, तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता? असा जाब विचारल्याने दोघांत बाचाबाची झाली. वाद एवढ्या विकोपाला गेला की दोघात हाणामारी सुरु झाली. पवन याने दारूच्या नशेत असलेल्या वडील शिवाजी हंकारे यांना अगोदर हाताने मारहाण केली. त्यानंतर हातातील कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार केले. ज्यात शिवाजी हंकारे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्वतः पोलिसात हजर...
वडीलांवर कोयत्याने सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पवन घाबरला. त्यामुळे त्याने मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात झाकून ठेवला. मात्र, 25 जूनरोजी भीतीपोटी तो स्वत:हून युसूफवडगाव ठाण्यात हजर झाला. आपणच आपल्या वडिलाची हत्या केली असून, मृतदेह सोयाबीनच्या भुसकटात झाकून ठेवला असल्याची कबुली दिली. त्यानंतर केज पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
ऊसतोड मुकादमाची हत्या...
बीड जिल्ह्यातील खुनाच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी एका खुनाची घटना समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील धोंडराई येथील ऊसतोड मुकादम बबन नारायण सुतार (55, रा. धोंडराई, ता. गेवराई) यांची हत्या करण्यात आली आहे. दीड लाख रुपयांसाठी तगादा लावल्याने मजूर व ट्रॅक्टर चालकांनी मिळून त्यांना तलावात बुडवून मारले, त्यानंतर पाय घसरून पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याचा बहाणा केल्याचे निष्पन्न झाले. अंमळनेर पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. अतुल बबन शिंदे (रा. आडगाव, ता. गेवराई), सोनाजी सीताराम पाचे (रा. धोंडराई) असे आरोपींची नावे आहेत.