Marathwada Rain Update: परतीच्या पावसाने जाता-जाता पुन्हा एकदा मराठवाड्यात धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस होत असून आजही काही भागांत पाऊस झाला. गेल्या 24 तासांत मराठवाडा विभागात सरासरी 20.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाच जिल्ह्यांतील 14 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे.
दोन दिवसांच्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्यात धुमाकूळ घातला असतानाच, मराठवाड्यात आणखी दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात शनिवारी आठही जिल्ह्यांत कमी-अधिक पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांच्या काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा विभागात 695.6 मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना 806.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ज्यात सर्वाधिक 130 टक्के पाऊस नांदेडमध्ये, जालन्यात 129.76 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
या भागात अतिवृष्टी...
चौका (87.3) वेरूळ (157.5), बाजार सावंगी (105.3), राजुरी (69), थेरला (65.3), अमळनेर (74.3), आष्टी (67.3), कडा (67.3), केदारखेडा (89.8), भोकर (66.3), परंडा (99.3), असू (85.8), सोनारी (73.8), डाळिंब (71) या मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
माजलगाव धरण भरले...
शुक्रवारी झालेल्या जोरदार पावसाने बीड जिल्ह्यात सुद्धा हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागात नदी नाल्यांना पूर आले आहे. तर बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण 100 टक्के भरले आहे. सद्या माजलगाव धरणात 15 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु असून, 15 हजारनेच विसर्ग सुद्धा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे धरण कार्यक्षेत्रात आतापर्यंत 560 मिलिमीटर पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.
जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग...
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणावर सुरु झाली आहे. त्यामुळे बंद केलेले दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून सद्या 18 हजार 864 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. तर पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग सुद्धा वाढवण्यात येणार असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणाचे पुन्हा 18 दरवाजे उघडले, पाण्याची आवकही वाढली
Aurangabad: अवघ्या 20 मिनटात 25 अपघात, संतप्त वाहनधारकांकडून रास्ता रोको