Aurangabad News: औरंगाबाद- पैठण रस्त्यावरील ढोरकीनजवळ एकामागून-एक द्दुचाकी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित सामंतर जलवाहिनीचे काम सुरु असल्याने रस्त्यावर माती आणि चिखल झाला आहे. त्यामुळे एकामागून एक असे 20 जणांचा गाडी स्लीप होऊन अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी सुद्धा झाले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे  रस्त्यावर  काही वेळेसाठी वाहतूक ठप्प झाली होती. 


याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर समांतर जलवाहिनीचे काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यात बाजूने खड्डे केल्याने त्याची माती रस्त्यावर आली आहे. दरम्यान काल रात्री झालेल्या पावसामुळे संपूर्ण रस्त्यावर चिखल पाहायला मिळाले. त्यामुळे त्यावरून जाणारे दुचाकीस्वार स्लीप होऊन पडत होते. विशेष म्हणजे अवघ्या वीस मिनटात 25 दुचाकीस्वार याठिकाणी स्लीप झाले. यात अनेकजण किरकोळ जखमी झाले आहे. तर काहींनी वेळीच गाडीवर नियंत्रण मिळवल्याने पडता-पडता वाचले. 


वाहनधारकांचा रास्ता रोको...


समांतर जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आज झालेल्या एकामागून एक अपघाताच्या घटनेनंतर वाहनधारकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. तर काही वाहनधारकांनी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरिकांनी सुद्धा गर्दी केली होती. मात्र नागरिकांचा रोष लक्षात घेता कंत्राटदाराकडून तत्काळ जेसीबीच्या मदतीने रस्त्यावरील चिखल बाजूला करण्यात आला.  


पर्यायी रस्त्याची मागणी... 


औरंगाबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. यासाठी औरंगाबाद-पैठण राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने पाइपलाईन टाकण्यात येत आहे. काम पूर्ण होण्यासाठी मोठा कालवधी लागणार आहे. पण यामुळे रस्त्यावरील वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी काम सुरु असेल त्यावेळी त्या-त्या ठिकाणी पर्यायी रस्ता तयार करून देण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. 


वाहतुकीवर परिणाम...


पाणीपुरवठा योजेनेच्या कामाचा परिणाम औरंगाबाद-पैठण रस्त्यावरील वाहतुकीवर सुद्धा होतांना पाहायला मिळत आहे. कारण रस्त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे करण्यात आले आहे. त्यामुळे त्या खड्ड्यातील माती रस्त्यावर आली असून, रस्ता छोटा झाला आहे. आधीच हा रस्ता छोटा असल्याने चौपदरीकरणाची मागणी होत आहे. त्यात आता आणखी छोटा रस्ता झाल्याने ट्राफिक जाम होत आहे. अनेकदा लांबच-लांब वाहनाच्या रांगा लागल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.