बीड जाळपोळ प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजणार, अजित पवार गटाच्या आमदाराचा थेट इशारा
Beed News : बीड जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे कार्यालय आणि नेत्यांची घरं पेटवून देण्यात आले होते.
बीड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरु असतानाच बीड (Beed) जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना समोर आल्या होत्या. यावेळी राजकीय पक्षाचे कार्यालय आणि नेत्यांची घरं पेटवून देण्यात आले होते. दरम्यान, आता हेच जाळपोळ प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजणार आहे. माजलगावातील जाळपोळ, दगडफेकीच्या प्रकरणास पोलिसांची निष्क्रियताच जबाबदार आहे. त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला असून, आपण हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी सांगितले आहे.
सोळंके यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "आपल्या घरावर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली त्यामागे राजकीय विरोधकांचा हात असू, शकतो असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. तसेच, त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नाही असाही आरोप त्यांनी केला. तर, जाळपोळ, दगडफेकीचं प्रकरण आपण हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
मलाच व्हिलन करण्याचा प्रयत्न
दरम्यान, यावेळी बोलतांना सोळंके म्हणाले की, "माजलगावातील जाळपोळ, दगडफेकीच्या प्रकरणास पोलिसांची निष्क्रियताच जबाबदार आहे. त्यामुळेच हा सर्व प्रकार आपण हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे. तसेच, या प्रकरणात मीच व्हिक्टिम असताना मलाच व्हिलन करण्याचा प्रयत्न काही जण करत असल्याचे सोळंके म्हणाले. माझ्या घरावरील हल्ला प्रत्यक्ष मी पाहिला नाही. त्यामुळेच मी पोलिसांत तक्रार दिली नाही. या प्रकरणात पोलिसांनी पुराव्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.
निरापराध लोकांवर गुन्हे दाखल करू नयेत...
माजलगाव बंदच्या आंदोलनात जवळपास 5 हजार लोकांचा समावेश होता. परंतु, हे सर्वच काही जबाबदार नाहीत. सीसीटीव्ही इतर फुटेजवरून यात केवळ 200 ते 250 लोक सहभागी असल्याचे दिसत आहे. इतरांना पोलिसांनी त्रास देऊ नये. तरीही पोलिसांकडून काही निरापराध लोकांवर गुन्हे दाखल केले जात असल्याची माहिती मला मिळाली आहे. हे चुकीचे आहे. पोलिसांनी ज्यांच्याविरोधात पुरावे आहेत, अशाच लोकांना अटक करावी, असेही सोळंके म्हणाले.
हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज आले समोर...
बीड जिल्ह्यात झालेल्या जाळपोळी आणि दगडफेकीच्या घटनेत आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. ज्यात एक मोठा जमाव सोळुंके यांच्या गाड्यांची तोडफोड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, याच जमावातील काहींच्या हातात लाठ्या-काठ्या देखील पाहायला मिळतात. यावेळी काही पोलीस देखील उपस्थित होते. मात्र, जमाव अधिक असल्याने पोलीस देखील हतबल झाल्याचे दृश्यांमधून पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: