Beed News : बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संतापाची लाट असतानाच तसेच परळीमध्ये सरपंचाचा अपघाती मृत्यूनंतर आता आणखी एका घटनेनं बीड हादरलं आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अजय भोसले आणि भरत भोसले असं या सख्ख्या भावांचे नाव असून त्यांची हत्या नातेवाईकांनीच केली आहे. या प्रकरणी संशयित चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील


हत्या करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकासोबत जुना वाद होता. या वादातून काल (16 जानेवारी) रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली. हे दोघे भाऊ बीड नगर हद्दी वरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे आहेत. या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.


धाराशिवमध्येही पारधी समाजात हिंसा


दरम्यान, याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात विहिरीचे पाणी शेतात वाटपावरून दोन गटात झालेल्या मारामारीत तीन जणांना जीव गमवावा लागला, तर 4 जण जखमी झाले. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील बावी गावात ही घटना घडली.पारधी समाजातील दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये हिंसा झाली. वाशी तालुक्यातील बावी गावात पारधी वस्ती येथे राहणाऱ्या आप्पा काळे, सुनील काळे आणि वैजनाथ काळे या तीन भावांमध्ये विहिरीच्या पाण्यावरून भांडण झाले. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून एका महिलेसह चार जण जखमी झाले होते. 


शेतात पाणीपुरवठ्यावरून हाणामारी


धाराशिव जिल्ह्यातील एका गावात शेतासाठी विहिरीचे पाणी वाटपावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटातील सदस्यांनी एकमेकांवर लाकडी दांडके, विळा आणि चाकूने हल्ला केला, परिणामी आप्पा काळे (65), परमेशर काळे (22) आणि सुनील काळे यांचा मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या