Somnath Surawanshi Parbhani परभणी: पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Surawanshi) यांच्या आरोपींवर अद्याप कारवाई न झाल्याने आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंबेडकरी अनुयायांचा आज (17 जानेवारी) परभणी ते मुंबई लाँग मार्च निघणार आहे. दुपारी 1 वाजता परभणीतून हा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार आहे. 


जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाची आंबेडकरी नेते आणि अनुयायांसोबत बैठक झाली. प्रशासनाने कारवाई आणि चौकशी साठी वेळ मागितला होता. मात्र सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होऊन एक महिना उलटून गेला तरीही प्रशासनानं पोलिसांवर कारवाई केली नाही. त्यामुळे आता वेळ न देता आज लॉंग मार्च काढण्याचा निर्णय आंबेडकरी नेते आणि अनुयायांनी घेतला असून आज दुपारी एक वाजता परभणीतील धरणे आंदोलन स्थळापासून हा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार आहे. दिवंगत नेते विजय वाकोडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे या लाँग मार्चचे नेतृत्व करणार आहेत.


सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा मदत नाकारली - 


न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा सरकारी मदत नाकारली आहे. गुरुवारी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे,तहसीलदार आदि पथक सोमनाथची आई आणि भाव यांची भेट घेवून सरकारने जाहीर केलेली 10 लाखांची मदत घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी जोपर्यंत सोमनाथच्या मृत्यूला दोषी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मदत स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या पथकाला परतावे लागले.


नेमकी घटना काय?


परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.




संबंधित बातमी:


परभणी प्रकरणातील मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, सचिन खरातांनी दिला आंदोलनाचा इशारा