बीड : मराठवाड्याच्या विकासासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Cabinet Meeting) मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यांना देण्यात आला. पण यामधील बीड (Beed) जिल्ह्याला जो निधी मिळाला तो अगदीच तुटपुंजा असल्याचं बीडकरांचं म्हणणं आहे. तर संपूर्ण जिल्ह्याला जो निधी देण्यात आला त्यामधील सर्वात जास्त निधी हा परळी तालुक्याला देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संतप्त होऊन काही सामाजिक कार्यकर्त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. तर या आंदोलनामध्ये 'धनु भाऊची किमया न्यारी, जिल्ह्यापेक्षा तालुका भारी' अशा घोषणा देखील देण्यात आली. 


परळी तालुका हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे परळीला मिळालेला निधी हा सर्वात जास्त असल्याचं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. तर जिल्ह्याला बाजूला सारुन तालुक्याकडे जास्त लक्ष केंद्रीत होत असल्याचा दावा देखील या आंदोलनकर्त्यांकडून केला जातोय. 


बीड जिल्ह्यात दुष्काळाचं सावट


ऑगस्ट महिन्यात पावसाने घेतलेल्या मोठ्या विश्रांतीमुळे बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट ओढावलं. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी जोर धरु लागलीये. तर 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमावरील कोट्यावधी रुपयांचा खर्च टाळण्यासाठी हा कार्यक्रम देखील रद्द करण्याता यावा अशी देखील मागणी सध्या बीड जिल्ह्यात केली जातेय. 


परळी तालुक्याला नेमकं काय मिळालं?


बीडमधील परळी येथे असलेला  ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथाच्या विकासाठी सुधारित  286. 68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आलीये. तर परळी वैद्यनाथ शहर बसस्थानाकाच्या नूतनीकरणाच्या 28 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास देखील मंजूरी देण्यात आली आहे.  परळी वैद्यनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र त्याचबरोबर शासकीय कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास  मान्यता मिळाली. परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मलकवाडी (कांगणेवाडी), उजनी, खो.सावरगाव, गोवर्धन तांडा, कन्हेरवाडी, वाका, मांडवा (परळी), पाडोळी, सारडगाव येथील साठवण तलावांना देखील मान्यता मिळाली आहे. 


बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यांना काय मिळालं?


बीडमधील जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणण्यात येणार आहे. तर पुढे हेच पाणी माजलगावच्या उजव्या कालव्यातून बाहेर काढण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 84 हजार 850 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव या आठ तालुक्यांमध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेतून 1600 मुलींसाठी वसतिगृहे आणि शाळा उभारण्यात येतील. सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत अंबाजोगाई सह मराठवाड्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी एकूण 253.70 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मराठवाड्यातील कृषी विभागाच्या विविध विकास कामांसाठी 709 कोटी 49 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.  


हेही वाचा : 


Marathwada Cabinet Meeting : दुष्काळी बीड जिल्ह्याला मंत्रिमंडळ बैठकीत काय मिळाले?; पाहा संपूर्ण यादी...