बीड : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 'अमृत महोत्सव'च्या पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे मंत्रिमंडळाची बैठक (Marathwada Cabinet Meeting) पार पडली आहे. यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 59 हजार कोटींच्या कामांची घोषणा केली आहे. दरम्यान याचवेळी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडसाठी (Beed) देखील महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बीडच्या विकासात आणखी भर पडणार आहे. विशेष म्हणजे बीड हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे. 


बीड जिल्ह्याला काय काय मिळाले?



  • जायकवाडी टप्पा 2 अंतर्गत पैठण उजव्या कालव्यातून माजलगाव धरणात पाणी आणणे व पुढे माजलगाव उजव्या कालव्यातून हे पाणी 148 किमी पर्यंत घेऊन जाणे, याद्वारे जिल्ह्यातील 84 हजार 850 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या कामासाठी 536 कोटी 61 लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

  • परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकासाच्या सुधारित 286. 68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता. 

  • बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी परळी, अंबाजोगाई, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, माजलगाव व बीड या 8 तालुक्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेतून 1600 मुलींसाठी वसतिगृहे व शाळा उभारण्यास मान्यता देऊन 80.05 कोटी रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली.

  • सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत अंबाजोगाई सह मराठवाड्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी एकूण 253.70 कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली.

  • बीड जिल्हाधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी 63.68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली.

  • सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बीड येथील प्रशासकीय इमारतीच्या बांधकामास मान्यता देण्यात आली.

  • परळी वैद्यनाथ शहर बसस्थानाकाच्या नूतनीकरणाच्या 28 कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली.

  • परळी वैद्यनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र त्याचबरोबर शासकीय कृषी महाविद्यालय व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • पशु संवर्धन विभागामार्फत अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथे लाल कंधारी व देवणी व वंश जतन व संवर्धन करण्यासाठी पशु पैदास प्रक्षेत्र उभारण्यास मान्यता देण्यात आली.

  • परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मलकवाडी (कांगणेवाडी), उजनी, खो.सावरगाव, गोवर्धन तांडा, कन्हेरवाडी, वाका, मांडवा (परळी), पाडोळी, सारडगाव या साठवण तलावांना मान्यता देण्यात आली.

  • परळी तालुक्यातील सिरसाळा एमआयडीसीला मान्यता देऊन, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक खर्च करून एमआयडीसी कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली.

  • मराठवाड्यातील कृषी विभागाच्या विविध विकास कामांसाठी 709 कोटी 49 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, अंतर्गत ठाणा ता. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर येथे शासन अनुदानित कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Cabinet Meeting : मंत्रिमंडळाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पदरात काय पडलं? पाहा संपूर्ण यादी...