बीड : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यावर काल मध्यरात्री बीड (Beed) जिल्ह्यातल्या होळजवळ हल्ला झाला. वैजनाथ वाघमारे हे आपल्या पुतण्यासोबत होळवरुन आडसकडे जात होते. मध्यरात्री नगरहून आडसकडे जात असताना होळजवळ काही अज्ञात वैजनाथ वाघमारे यांच्या कारच्या समोर आले आणि काही बोलणे आधीच त्यांनी कारभार दगडफेक सुरु केली असं वैजनाथ वाघमारे यांचे म्हणणं आहे.


या दगडफेकीमध्ये वैजनाथ वाघमारे यांचा पुतण्या जखमी झाला आहे. यात वैजनाथ वाघमारे हे दगडफेकीत थोडक्याच बचावले आहेत. यापूर्वी आपण अनेक वेळा पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र पोलीस संरक्षण न दिल्यामुळे हा आपल्यावर हल्ला झाल्याचं वैजनाथ वाघमारे यांनी म्हटलं आहे. या हल्ल्या संदर्भात वैजनाथ वाघमारे हे तक्रार देण्यासाठी सध्या केस तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत.


'सुरक्षा दिली असती तर हल्लाच झाला नसता'


या हल्ल्यानंतर वैजनाथ वाघमारे चांगलेच हादरुन गेले आहेत. माझ्यावरील हल्ल्याने आमचं कुटुंब हादरुन गेलं आहे. आमच्या जीवाला धोका आहे. हल्लेखोर कोण माहीत नाही. या हल्ल्याची चौकशी व्हावीच, अशी मागणी वाघमारे यांनी केली. तसंच आपल्यासह कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी मी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु वारंवार मागणी करुनही सुरक्षा देण्यात आली नाही, अशी खंत व्यक्त त्यांनी व्यक्त केली. आज मला सुरक्षा असती तर हा हल्लाच झाला नसता, असंही त्यांनी म्हटलं.


आम्ही विभक्त झालो कारण... : वैजनाथ वाघमारे


दरम्यान काही महिन्यांपूर्वी एबीपी माझाशी बोलताना वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त होण्याचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, "सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ नये असं मला वाटत होतं. त्या भाडोत्री वाहन म्हणून राष्ट्रवादीत गेल्या. त्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेला. त्यांचे विचार वेगळे राहिले आणि माझे विचार वेगळे राहिले. सुषमा अंधारे आंबेडकरी चळवळीच्या मुलुख मैदानी तोफ होत्या. मला त्यांना नेताच करायचं होतं. मला त्यांना झोपडपट्टीत पाठवायचं नव्हतं किंवा ऊसतोड कामगार, विटभट्टी कामगार म्हणून पाठवायचं नव्हतं. पण ‘चकली देणं आणि हलकी डोलकीचा तमाशा उभा करणं’ योग्य वाटलं नाही. तो त्यांचा निर्णय होता आणि तो मला मान्य नव्हता. त्यामुळे तेव्हापासून आमच्या दोघांमध्ये कोणताही संबंध नाही."