बीड : आर्थिक विकासामध्ये पिछाडीवर असलेला बीड जिल्हा हा सामाजिक विकासामध्येही मागे असल्याचं वेळोवेळी दिसून येतंय. गेल्या वर्षी एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 300 हून अधिक बालविवाह झाल्याची नोंद आहे. तर 258 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. या प्रकरणी 18 जणांवर गुन्हा नोंदवण्यता आला आहे. जेवढ्या बालविवाहाची नोंद झाली आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक बालविवाह झाल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये आहे. 


बीड जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी मागील काही वर्षांमध्ये प्रशासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्याच माध्यमातून काही बालविवाह रोखण्यास प्रशासनाला यश आलं. मात्र जिल्ह्यात बालविवाह रोखले जात असल्याने इतर ठिकाणी जाऊन बालविवाह होत असल्याची माहिती समोर येत आहे. ही चिंतेची बाब असल्याचं जिल्हा बाल प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात प्रामुख्याने ऊसतोड कामगार मुलांच्या बालविवाहाचा समावेश आहे.


Maharashtra Child Marriages : बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन बालविवाह 


बीड जिल्हा समन्वयक बाल प्रकल्प अधिकारी अश्विनी जगताप यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांमध्ये प्रशासनाने केलेल्या जागृतीमुळे आणि कडक अंमलबजावणीमुळे बालविवाहांची संख्या कमी झाली आहे. पण अजूनही अनेक लोक हे जिल्ह्याच्या बाहेर जाऊन बालविवाह लावतात ही चिंतेची बाब आहे. तसेच अनेक ठिकाणी बालविवाह होत असले तरी ते उघडकीस येत नाहीत. त्यामुळे बालविवाहांची संख्या ही नोंद केलेल्या संख्येपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 


जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे बालविवाह होत असतील त्या ठिकाणचे सरपंच, तलाठी यांच्यामार्फत फॉलोअप घेतला जातो आणि अर्ध्या तासात तो बालविवाह रोखला जातो अशी माहिती अश्विनी जगताप यांनी दिली. 


Beed Child Marriages : बालविवाहाची कारणे


मुलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्रामीण भागात पालक चिंतेत असतात. त्यात ऊसतोडीसाठी कामगारांचे स्थलांतर होते. त्यामुळे त्यांच्या किशोरवयीन मुलीचा प्रश्न निर्माण होतो. अशातच बालविवाहाचा पर्याय पालकांकडून निवडला जातो. त्यामुळेच बीड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बालविवाहाचे सारखे प्रमाण आढळून आले आहे.


ही बातमी वाचा :