Traffic Rules : गाव असो वा शहर, शौकीन दुचाकीस्वार आपल्याला सर्रास पाहायला मिळतात. महागड्या बाईक्सवर स्टंट करणं आणि त्याचा व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणं हा त्यांचा आवडा छंदच. तसेच, सध्या टेक्नॉलॉजी (Technology) हातात आल्यामुळे मुलं फार कमी वयातच वेगवेगळी यंत्र, वाहनं हाताळण्यास शिकतात. अनेकदा पालक स्वतः मुलांना लहान वयातच वाहन चालवायला शिकवायला सुरुवात करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? हे कायद्यानं चुकीचं आहे. अल्पवयीनं मुलांना वाहन चालवण्यास कायद्यानं परवानगी नाही. जर एखादी अल्पवयीन व्यक्ती गाडी चालवताना आढळून आल्यास (Traffic Rules) त्यांना मोठा भुर्दंड पडू शकतोच, पण त्यासोबतच तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. 


25 हजारांहून अधिक दंड 


एखाद्या मुलाचं वय 18 वर्षांहून कमी असेल आणि जर तो वाहन चालवताना आढळून आला. अशावेळी त्याच्याकडे लर्निंग लायसन्सही नसेल, तर मात्र त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 199A नुसार अल्पवयीनं व्यक्ती जे वाहन चालवत असेल ते वाहन म्हणजेच, गाडी ज्याच्या नावावर असेल त्याला तब्बल 25 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. तसेच, त्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा होऊ शकते. 


काय आहे नियम? 


मोटार वाहन कायद्यानुसार, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वैध परवान्याशिवाय 50cc पेक्षा जास्त इंजिन असलेलं वाहन चालवता येत नाही. वाहनाच्या इंजिनची पॉवर क्षमता 50cc पेक्षा जास्त असल्यास लर्निंग लायसन्स असणं आवश्यक आहे. तसेच, कोणीही 25 किमी प्रतितास वेगानं धावणारी इलेक्ट्रिक दुचाकी चालवू शकतो. यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची किंवा नोंदणीची आवश्यकता नाही. परंतु, जर मूल खूप लहान असेल आणि गाडी चालवू शकत नसेल, तर मुलाच्या सुरक्षेबरोबरच इतरांच्या सुरक्षेचा विचार करणं, ही पालकांची जबाबदारी असते. त्यामुळं मुलानं कायद्यानं विहित केलेली वयोमर्यादा ओलांडल्याशिवाय, त्याला वाहन चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये. 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI