मुंबई : वाढत्या इंधनदरवाढीला आळा घालण्यासोबत पर्यावरणपूरक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. 'राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण'च्या निर्देशानंतर दिल्ली सरकारने 1 जानेवारी 2022 रोजी 10 वर्षे पूर्ण केलेल्या डिझेल वाहनांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. 15 वर्षे जुन्या पेट्रोल वाहनांची नोंदणीही रद्द करण्यात येत आहे.


अशा वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हे पाहता दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाने 'इलेक्ट्रिक किट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यां'चा पॅनल तयार केला असून यामध्ये महाराष्ट्रातील 'गोगोए १' कंपनीचा समावेश आहे. ही कंपनी दिल्लीतील पेट्रोल दुचाकींचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करणार आहे. मोटरसायकल इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किटला आरटीओकडून परवानगी प्राप्त ही देशातील पहिली स्टार्टअप कंपनी आहे.


२०११साली सुरु झालेली 'गोगोए१' ही इलेक्ट्रिक, सौर उर्जेवर चालणारी वाहने, त्यांचे भाग उपलब्ध करून देण्यात कार्यरत आहे. भारतात सर्वात जास्त विक्री होणाऱ्या हिरो स्प्लेंडर बाईकसाठी 'गोगोए१'ने इलेक्ट्रिक कन्व्हर्जन कीट गेल्या वर्षी  सप्टेंबरमध्ये लाँच केला. ७२ व्ही ४० एएच बॅटरी असून सिंगल चार्जमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये सरासरी १५१ किमी चालते. 


''इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते महत्व, पर्यावरणपूरक योजना पाहता आम्ही आमचे व्हिजन बनवले आहे. आपल्याकडील वाहनाला स्क्रॅप करण्यापेक्षा किंवा नवीन इलेक्ट्रिक वाहन खरेदीपेक्षा आहे त्यालाच इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करावे. खर्चाच्या दृष्टिकोनातून हे सोयीस्कर असून या वाहनांचे बाजारात सुटे भाग सहज उपलब्ध होतात. आम्ही तयार केलेल्या कन्व्हर्जन किट्सना महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू अशा विविध भागातून मागणी आहे. दिल्ली परिवहन विभागाकडून इलेक्ट्रिक वाहनांचे रूपांतर करण्याच्या योजनेत आमचा समावेश असणे ही आनंदाची गोष्ट आहे. दुचाकींसह आम्ही या वर्षी तीनचाकी वाहनांसाठी इलेक्ट्रिक किट बनवणार असून पुढील वर्षात चारचाकी, अवजड वाहनांसाठी किट बनवण्यात येईल.'' असे 'गोगोए१'चे संस्थापक श्रीकांत शिंदे म्हणाले.  


''अहमदनगरमध्ये आमचे मोठे सेंटर असून या ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांचा अभ्यास, उत्पादनांची निर्मिती, कन्व्हर्जन किट्स बनवणे, रोजगार निर्मितीसह त्यांना प्रशिक्षण देणे या गोष्टींवर भर दिला जातो. मुंबईतही लवकरच सेंटर बनवण्यात येणार आहे. देशभरात आमच्या ५०पेक्षा जास्त फ्रेंचायझी आहेत. आमचा किट लाँच झाल्यापासून मागणीमध्ये ६० टक्के वाढ दिसत आहे. सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागांची कमतरता आहे. त्यांची दुरुस्ती, देखभालबद्दल मेकॅनिकना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. या वाहनांचे जाळे विस्तारण्यासाठी आवश्यक चार्जिंग स्टेशन्स बनवणेही आवश्यक आहे.'' असेही ते पुढे म्हणाले. 


इलेक्ट्रिक वाहन म्हणजे काय, त्यांचे महत्व अशा अनेक विषयांना घेऊन सध्या या कंपनीतर्फे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांना व्होकेशनल कोर्सद्वारे शिकवण्यात येत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी अद्याप बाजारात इलेक्ट्रिक बाईक्स आणल्या नाहीत. अशात 'गोगोए१'ने आपली आवडती बाईक इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध केला आहे. 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI