मुंबई : राज्याचं नवं इलेक्ट्रिक कार धोरण आज पर्यावरण विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलं. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर तसेच त्यामुळे होणारे प्रदूषण आणि ग्लोबल वॉर्मिंग या सर्व समस्येवर इलेक्ट्रिक कार हा पर्यावरण पूरक असा पर्याय आहे. मात्र हा पर्याय सर्व सामान्य नागरिकांनाही परवडणारा आणि सोपा हवा. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल कारला उत्तम पर्याय म्हणून नागरिक इलेक्ट्रिक कार स्वीकारतील. या सर्वांसाठी राज्य सरकारचे नवं धोरण अतिशय महत्वाचं आहे. याच संदर्भात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे पत्रकार परीषद घेऊन धोरण जाहीर केल आहे.
कसं आहे महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण?
- 2025 पर्यंत नवीन वाहन नोंदणीत 10 टक्के वाटा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनाचा असेल.
- मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक शहरांमध्ये 2025 पर्यंत सार्वजनिक वाहतुकीचे 25 टक्के विद्युतीकरण करणार.
- 2025 पर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती आणि सोलापूर या 7 शहरांत सार्वजनिक आणि निम सार्वजनिक चार्जिंग सुविधा उभारणार.
- मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, पुणे ते नाशिक, मुंबई ते नागपूर या महामार्गांवर चार्जिंग सुविधा उभारणार.
- एप्रिल 2022 पासून मुख्य शहरांतील परिचालित होणारी सर्व नवीन सरकारी वाहनं ( मालकी / भाडे तत्वावरील ) ही इलेक्ट्रिक वाहने असतील.
आर्थिकरित्या कसं परवडेल?
महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण अंमलबजावणी खर्च 930 कोटी रुपये अपेक्षित आहे. हा खर्च टप्याटप्याने पुढील 4 वर्षात होण्याची शक्यता आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी निधी प्रस्तावित आहे. हा निधी जुन्या वाहनावरील हरित कर आणि विविध इंधनावरील उपकर सारख्या वेगवेगळ्या माध्यमातून एकत्रित करण्यात येईल. नवीन निवासी प्रकल्प विकासकांना 2022 पासून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेसाठी सज्ज पार्किंग खरेदी करण्याचा पर्याय देणे आवश्यक असेल.
- नवीन निवासी इमारती - 20 टक्के
- संस्थात्मक आणि व्यावसायिक संकुले - 25 टक्के
- सरकारी कार्यालये- 100 टक्के
पेट्रोल डिझेलसोबत पर्यावरणाचाही समतोल राखता येईल
सध्या पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत असताना इलेक्ट्रिक वाहन खुप उपयोगी असणार आहे. खिशासोबत पर्यावरणही चांगलं राहिल असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. लोकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे, कारण आजही लोक गाडीचं माइलेज, पिकअप इत्यादी गोष्टींकडे लोकाचं आकर्षण असते. पण इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत तसा थोडा फरक दिसून येतो. त्यामुळे नक्कीच जनजागृतीच सर्वांना काम करावं लागेल तसेच लॅाकडाऊन संपल्यावर या वाहनांचं प्रदर्शन भरवण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलं.