Electric Scooter Fire: गेल्या काही महिन्यात देशभरात अनेक इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागल्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहेत. याचीच आता सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) पाच ई-वाहन निर्माता कंपन्यांना नोटीस बजावली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांमधील आगीच्या घटनांची स्वत:हून दखल घेत प्राधिकरणाने पाच ई-वाहन उत्पादकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


त्यांनी सांगितलं की, सीसीपीएने डीआरडीओने स्थापन केलेल्या समितीकडूनही अहवाल मागवला आहे. सेंटर फॉर फायर एक्सप्लोसिव्ह अँड एन्व्हायर्नमेंट सेफ्टी (CFEES) च्या तज्ञांच्या टीमने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याची कारणे शोधून काढली आहेत. ही संस्था संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) अंतर्गत काम करते. निधी खरे म्हणाल्या की, इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्येही अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशातच बाजारात विकल्या जाणाऱ्या स्कूटर्स दुचाकी संबंधित नियमांची पूर्तता करून बनवले जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


या वर्षी देशभरात ई-स्कूटरला आग लागण्याच्या 38 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याने काही लोकांना जीवही गमवावा लागला आहे. या वर्षी मार्चमध्ये पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याची पहिली घटना समोर आली होती. यानंतर ओकिनावा येथील प्युअर ईव्ही, जितेंद्र इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक स्कूटरमध्येही आग लागण्याच्या काही घटना घडल्या. तसेच जूनमध्ये महाराष्ट्रात टाटा नेक्सॉन ईव्ही कारला आग लागली होती.


दरम्यान, इलेक्ट्रिक दुचाकीला लागणाऱ्या आगीचे कारण शोधण्यासाठी बनवण्यात आलेल्या समितीने आपल्या अहवालात असे निदर्शनास आणले आहे की, बॅटरी डिझाइन आणि मॉड्यूल तसेच इलेक्ट्रिक स्कूटरच्या संपूर्ण बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) मध्ये गंभीर समस्या आहे. ज्यामुळे बॅटरी जास्त गरम झाल्यामुळे आग पकडत आहेत. काही मोठ्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्या त्यांच्या उत्पादनांची किंमत कमी करण्यासाठी कमी दर्जाचे साहित्य वापरत असल्याचेही या समितीने सांगितले.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI