Emirati Businesswoman UAE Made Electric Car : संयुक्त अरब अमिराती (UAE) स्थित एम ग्लोरी होल्डिंग ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. माजिदा अलाझाझी (Dr Alazazi) या 'Made in UAE' इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. डॉ माजिदा अलाझाझी जून 2022 च्या अखेरीस 'अल दमानी' DMV300 नावाच्या पूर्णपणे इलेक्ट्रिक कारची पहिली खेप बाजारात लॉन्च करणार आहे.
अल दमानी DMV300 ही युएईमधील पहिली इलेक्ट्रिक कार युरोपियन वैशिष्ट्यांचा वापर करून बनवलेल्या दोन भिन्न मॉडेल्ससह, बॅटरीची क्षमता 52.7 kWh आहे आणि ती एका चार्जवर 405 किलोमीटरहून अधिक अंतर कव्हर करू शकते. दरम्यान, मार्च 2022 मध्ये, एम ग्लोरी होल्डिंग ग्रुपनं दुबई इंडस्ट्रियल सिटी (DIC) येथे इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) निर्मितीसाठी देशातील पहिल्या औद्योगिक सुविधेची पायाभरणी केली. 2024 पर्यंत या कारखान्याचं काम पूर्ण होणार आहे.
खलीज टाईम्सशी बोलताना डॉ. माजिदा म्हणाल्या की, "इलेक्ट्रिक कारला अल दमानी DMV300 असं नाव देण्यात आलं आहे. आम्ही दुबई इंडस्ट्रियल सिटी (DIC) मध्ये तात्पुरता कारखाना सुरू केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा कारखाना सुरू करण्यात आला होता. आम्ही काही दिवसांत उत्पादन सुरू करणार आहोत. आशा आहे की, इलेक्ट्रिक कार्सची पहिली खेप जूनच्या अखेरपर्यंत बाजारात दाखल झालेली असेल." तसेच, युएईमधील या पहिल्या वहिल्या इलेक्ट्रिक कारच्या हजारो ऑर्डर्स आधीपासूनच मिळालेल्या असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं होतं.
"सध्या आमचा इलेक्ट्रिक कार्स तयार करण्याचा कारखाना तात्पुरत्या ठिकाणी सुरु आहे. आमच्या मुख्य कारखान्याचं काम सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या कारखान्यातून दररोज आठ ते 10 कार आणि वर्षाला 10,000 कार तयार करण्याची क्षमता आहे. पण लवकरच आमच्या मुख्य कारखान्याचं काम पूर्ण होईल, त्यानंतर मात्र त्या कारखान्यातून वर्षाकाठी 50 ते 70 हजार कार तयार करण्याचा आमचा प्रयत्न असेल.", असंही त्यांनी सांगितलं.
यूएईमधील पहिली इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या एम ग्लोरी होल्डिंग ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. माजिदा अलाझाझी यांनी UAE विद्यापीठातून Business Administration in Supply Chain Management and Manufacturing मध्ये डॉक्टरेट मिळवणाऱ्या यूएईतील पहिल्या महिला आहेत. या क्षेत्रातील आवड जोपासत त्यांनी सँडस्टॉर्म मोटर व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंग नावाचा ऑटोमोटिव्ह कारखाना उघडला आहे. याशिवाय, माजिदा विविध कंपन्यांच्या प्रमुख आहेत आणि त्यांनी सरकारी आणि निम-सरकारी कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केलं आहे. "आम्ही UAE सरकारच्या net-zero goals च्या दृष्टीकोनानुसार काम करत आहोत.", असंही त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.
दरम्यान, सौदी अरेबियात गेली कित्येक वर्ष महिलांना साधं ड्रायव्हिंग लायसन्सही मिळत नव्हतं. Loujain Alhathloul या महिलेनं यासाठी मोठी चळवळ उभी केली होती. त्यानंतर सौदीमध्ये सर्व महिलांना ड्रायविंग लायसन्स मिळू लागलं. अशाच एका आखाती देशातील महिला चक्क यूएईमधील पहिल्या इलेक्ट्रिक कारसाठी झटटेय. हे खरंच कौतुकास्पद आहे.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI