औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोपांप्रकरणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खुलासा केला आहे. मी संबंधित वक्तव्य एमआयएमला उद्देशून केलं होतं. माझ्याकडून वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख अनावधनाने झाला, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने 2 जून रोजी म्हणजेच आज चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात होणारं आंदोलन रद्द केलं आहे. 


चंद्रकांत खैरे यांनी पत्रात काय म्हटलं?
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रकात खैरे यांनी लिहिलं आहे की, "जालना इथे चार दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजपने एमआयएम आणि वचितचा एक हजार कोटी रुपये दिल्याचं वक्तव्य केलं होतं. परंतु मी हे वक्तव्य एमआयएमला उद्देशून केलं होतं. यात वंचित बहुजन आघाडीचं नाव मी अनावधानाने घेतलं. वंचितबाबत मी हे वक्तव्य मागे घेत आहे. माझं वक्तव्य एमआयएमसाठी होतं, ते कायम आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता." 




राजकीय विरोधकांनी भान ठेवून बोलावं : सिद्धार्थ मोकळे
"वंचित बहुजन आघाडीचे चारित्र्य स्वच्छ आहे. त्यावर कोणीही शिंतोडे उडवू शकत नाही. खोटे आरोप करुन पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे. त्यामुळे राजकीय विरोधकांनी बोलताना भान ठेवून बोलावं, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटलं


खैरे विरुद्ध वंचित वाद
जालन्यातील कार्यक्रमात चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये संतापाचं वातावरण पाहायाला मिळत होतं. खैरे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खैरे दिसतील तिथे त्याचं तोंड काळे करु असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला होता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विरुद्ध चंद्रकांत खैरे असा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं होतं की, "चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी बकले यांनी केली. दोन दिवसात त्यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा बकले यांनी दिला होता." शिवाय चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला होता.



काय म्हणाले होते चंद्रकांत खैरे?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमावले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी केला होता.

 

संबंधित बातम्या