Aurangabad Crime News: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कारकीन गावात मंगळवारी चार वर्षाच्या मुलासह एका 30 वर्षीय महिलेचा विहिरीत मृतदेह आढळून आला होता. सुरवातीला ही आत्महत्या असल्याचे वाटत होते. पोलिसांनी त्यानुसार गुन्हाही दाखल केला होता. मात्र ही आत्महत्या नसून अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीनेच आपल्या पत्नीसह चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी पैठण एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहाजान शहा ( रा. कारकीन ) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील कारकीन येथील बानोबी शहाजान शहा ( वय 30 वर्ष, रा. कारकीन ) आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा अल्तमश शहा ( वय 4 वर्षे ) यांचा मृतदेह त्यांच्याच शेतात मंगळवारी आढळून आला होता. सुरवातीला आत्महत्या असल्याच गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता. मात्र बानोबी आणि त्यांच्या मुलाचा पती शहाजान यानेच डोक्यात दगडाने मारहाण करून हत्या केल्याच समोर आले आहे. त्यांनतर शहाजान याने कुणाला संशय येऊ नयेत म्हणून विहिरीत मृतदेह फेकून, आत्महत्येचा बनाव रचला.
असा झाला खुलासा...
बानोबी यांचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र बानोबी यांचा पती घटना उघडकीस आल्यापासून फरार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोमवारी रात्री नेमकं काय घडलं आणि बानोबी यांनी केलेल्या आत्महत्येचे कारण काय हे त्यांच्या पती समोर आल्यानंतरच स्पष्ट होणार होते. त्यात बानोबी यांच्या डोक्याला मारहाण केल्याची मोठी जखम असल्याने पोलिसांचा संशय वाढला. त्यामुळे पैठणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी एक पथक नेमत फरार शहाजानला शोधण्यासाठी पाठवला. या पथकाने फरार आरोपीला बुलढाणा येथून ताब्यात घेतले. त्यांनतर पत्नीचे खून आपणच केल्याची त्याने कबुली दिली.
पत्नीवर करायचा संशय...
आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या शहाजन संशय करायचा. त्यामुळे पत्नीसोबत तो नेहमी वाद घालायचा. तर मुलगाही माझा नसल्याच तो पत्नीला सतत म्हणायाचा. त्यामुळे सोमवारी रात्रीच्या सुमारास पत्नी आणि मुलाची हत्या करून मृतदेह आपल्याच शेतातील विहिरीत फेकून शहाजन फरार झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.