Chandrakant Khaire Vs Vanchit Bahujan Aghadi: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या विधानावरून वंचित बहुजन आघाडीत संतापाचे वातावरण पाहायाला मिळत आहे. खैरे यांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा खैरे दिसतील तिथे त्याचं तोंड काळे करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी विरुद्ध खैरे असा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे की, चंद्रकांत खैरे यांना आम्ही दोन दिवसांचा वेळ दिला आहे. ज्याप्रमाणे खैरेंनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद शहरात कुठेही पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी बकले यांनी केली. दोन दिवसात त्यांनी माफी मागितली नाही तर, खैरे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा बकले यांनी दिला आहे.
खैरेंच्या विरोधात न्यायालयात जाणार...
लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरेंच्या या आरोपांवर वंचीत बहुजन आघाडीकडून उत्तर देण्यात येत आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार असून खैरेंनी तयार राहावे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते खैरे...
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला आहे.