Chandrakant Khaire Vs Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरेंच्या या आरोपांवर वंचीत बहुजन आघाडीकडून उत्तर देण्यात आले आहे. खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार असून खैरेंनी तयार राहावे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांनी दिला आहे.


खैरेंच्या आरोपांवर बोलताना फारुख अहमद म्हणाले की, खैरेंना बोलण्याचा स्वातंत्र्य असलं तरीही त्यांनी इतरांवर आरोप करताना विचारपूर्वक बोलावे. जर खैरे यांच्याकडे पैसे दिल्याचे किंवा घेतल्याचे पुरावे असतील तर त्यांनी ते सादर करावेत. ते सत्तेत आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, त्यामुळे सर्व तपास यंत्रणा त्यांच्या हातात असताना असे बिनबुडाचे आरोप खैरे करत आहे. यापूर्वी सुद्धा शिवसेनेच्या नेत्याने असेच आरोप केले होते, पुढे त्याला माफी मागत फिरावे लागल्याचं अहमद म्हणाले.


खैरे तयार रहा...


यावेळी पुढे बोलताना फारुख अहमद म्हणाले की, स्वच्छ चारित्र्य असलेल्या वंचित बहुजन आघाडीवर शिंतोडे उडवण्याचे काम करत आहे. त्यामुळे खोटे आणि निराधार आरोप करणाऱ्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात गेल्या शिवाय रहाणार नाही. पुराव्या शिवाय आरोप करणाऱ्यांनी डीफेमेशनच्या याचिकेसाठी आता तयार रहावे असा इशारा सुद्धा यावेळी अहमद यांनी दिला.


काय म्हणाले होते खैरे...


वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला आहे.