Chandrakant Khaire on MIM: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी असाच आरोप शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला होता. त्यांनतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे खैरे यांनी केलेल्या आरोपामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची  शक्यता आहे. 


जालना दौऱ्यावर असलेल्या खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले  की, ईडीच्या चालबाजी कशा असतात मला सर्व काही माहित आहे. मी त्या कमिटीवर होतो. फक्त घाबरव्याचं बोलवायचं आणि फक्त शिवसेनेच्या लोकांना दाबायच. तुम्ही किती कमवले, कुठून आले एवढे पैसे तुमच्याकडे. लोकसभा निवडणुकीत एक हजार कोटी रुपये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमला भाजपने दिले होते. उत्तर प्रदेशमध्ये आता निवडणूक झाली. त्याठिकाणी समाजवादी पार्टीच्या लोकांना फोडण्यासाठी कशाला पैसे दिले. तुम्ही हे सर्व धंदे करतात, आले कुठून हे पैसे असा आरोप खैरे यांनी यावेळी केला. 


तर वंचितकडून आक्रमक भूमिका... 


कळमनुरी मतदारसंघाचे आमदार यांनी काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत एक हजार कोटी घेतल्याचा आरोप केला होता. त्यांनतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ठीक-ठिकाणी निदर्शने केली होती. तर आमदार संतोष बांगर यांना राज्यात फिरू देणार नसल्याचा इशारा वंचितकडून देण्यात आला होता. त्यांनतर बांगर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. आता खैरे यांनी सुद्धा पुन्हा तोच आरोप प्रकाश आंबेडकर यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वंचित आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. 


एमआयएम 'बी; तर मनसे 'सी' टीम... 


यावेळी बोलताना खैरे यांनी एमआयएम आणि मनसेवर सुद्धा निशाणा साधला. एमआयएमसोबत भाजपचे संबध आहे. अनेक निवडणुकीत भाजपला जिंकण्यासाठी मदत करता आणि महाराष्ट्रात सुद्धा केली. त्यामुळे ते भाजपचे 'बी' टीम आहे. तर औरंगाबाद येऊन मोठी सभा घेणारे 'सी' टीम म्हणून काम करतात. त्यांच्या सभेला भाजपकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप खैरे यांनी केला.