औरंगाबाद : ठाण्याच्या उत्तर सभेमध्ये मशिदीवरचे भोंगे उतरवण्याची घोषणा करणारे आणि पुण्यामध्ये हनुमानाची महाआरती करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता औरंगाबादच्या सभेत कोणती नवी घोषणा करणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधील महत्त्वाची बाब म्हणजे औरंगाबादचा संभाजीनगर असा आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्याला मनसेने हात घातल्याचं दिसतं.


राज ठाकरेंच्या सभेला परवानगीबाबत पोलिसांचा सस्पेन्स कायम
राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेज उभारण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे औरंगाबाद पोलीस आयुक्तांची राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत सोमवारी (25 एप्रिल) झालेल्या बैठकीमध्ये परवानगीबाबत विचारणा केल्याचं समजतं. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का या प्रश्नाच्या उत्तराबद्दल पोलिसांनी अजूनही सस्पेन्स ठेवला आहे.


राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी देण्याबाबत अजूनही मौन बाळगलं आहे. अर्ज करुन सहा ते सात दिवस झाले असले तरी पोलिसांनी परवानगीबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी स्टेजची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे.


अनेक संघटनांचा मनसेच्या सभेला विरोध
एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली जात आहेत आहे. 19 एप्रिल रोजी दिवसभरात वंचित बहुजन आघाडी, प्रहार संघटना, मौलांना आझाद  विचार मंच, गब्बर ॲक्शन संघटना आणि ऑल इंडिया पँथर सेना या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी असं निवेदन दिलं होतं.



संबंधित बातम्या