औरंगाबाद : औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी काल (19 एप्रिल) या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मात्र राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीसह पाच संघटनांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला विरोध केला आहे. राज यांच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी घोषणा केलेल्या १ तारखेच्या सभेला परवानगी मिळते का असा प्रश्न आहे.


एकीकडे मनसेने राज ठाकरेंच्या सभेसाठी तयारी सुरु केली असताना दुसरीकडे विरोध केला जात आहे. सध्याची परिस्थिती, रमाजानचा महिना आणि कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा असे विविध विषय उपस्थित करत अनेक संघटना दररोज पोलीस आयुक्तांना भेटून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये अशी निवेदनं दिली जात आहेत आहे. काल (19 एप्रिल) दिवसभरात पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी असं निवेदन दिलं.


कोणत्या पक्ष संघटनांचा राज ठाकरेंच्या सभेला विरोध?
1. वंचित बहुजन आघाडी .
2. प्रहार संघटना
3. मौलांना आझाद  विचार मंच 
4. गब्बर ॲक्शन संघटना
5.ऑल इंडिया पँथर सेना


मनसेच्या सभेला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
तर मनसेने पोलीस आयुक्त कार्यालयात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी निवेदन दिलं. यावर पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरातील पोलीस निरीक्षक यांची बैठक झाली. त्यात राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 2011 मध्ये मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांना झालेल्या मारहाणीविरोधात राज ठाकरेंनी सभा घेतली होती. परंतु पोलिसांनी मनसेला ताटकळत ठेवत सभेच्या चार तास आधी परवानगी दिली होती. आता राज ठाकरेंच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलीस अशीच रणनीती आखणार असल्याची चर्चा आहे.


औरंगाबाद इथल्या वादग्रस्त सभेचे विषय आणि पोलीस परवानगीचा इतिहास


1. 5 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वेरुळ लेणीचा दौरा होता. त्यावेळी मनसेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात घुसले आणि पोलिसांसोबत अरेरावी केली, असा आरोप करत पोलिसांनी जाधव यांना मारहाण केली होती. पोलिसांनी आपल्या आमदाराला अमानुष मारहाण केली असं म्हणत राज ठाकरे यांनी 12 जानेवारी 2011 रोजी मराठवाडा संस्कृतिक मैदानावर सभा घेतली. या सभेला परवानगीसाठी पोलिसांनी मनसेला ताटकळत ठेवलं होतं. सभेच्या काही तास आधी परवानगी दिली होती.


2. हिजाब गर्ल मुस्कान हिचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 14 मार्चला औरंगाबादेतील आमखास मैदानावर सत्कार ठेवला होता. पोलिसांनी 13 तारखेला रात्री परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने कोर्टात धाव घेतली मात्र त्याचा फायदा झाला नाही.