Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली पुढील जाहीर सभा औरंगाबाद येथे होणार असल्याचे जाहीर केले. ही सभा 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी आपली आगामी सभा औरंगाबाद येथे का घेतली यावर आता चर्चा सुरू झाली आहे. या सभेमागे काही राजकीय कारणांसोबत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेचा संदर्भ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेची ताकद औरंगाबादमध्ये आहे. शिवसेना महाराष्ट्रात वाढत असताना औरंगाबादची महत्त्वाची भूमिका आहे. मुंबई महापालिकेनंतर शिवसेनेची औरंगाबाद महापालिकेवर निर्विवाद 30 वर्षे सत्ता आहे. सध्या शहरातील 3 आमदारांपैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. जिल्ह्यातील नऊ आमदारांपैकी सहा आमदार शिवसेनेचे आहेत आणि एक विधान परिषदेत आहेत असे 7 आमदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या शिवसेनेसाठी औरंगाबाद महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबादेत ओवैसी यांच्या एमआयएमची देखील चांगली ताकद आहे. औरंगाबादमध्ये एमआयएमचा एक खासदार आणि औरंगाबाद महापालिकेत 22 नगरसेवक आहेत. त्याशिवाय, औरंगाबादमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. औरंगाबादमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत.
राज यांच्या सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान का?
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांनी आपल्या सभेची घोषणा केली आहे. शिवसेनेच्यादृष्टीने आणि राजकीयदृष्टीने या मैदानाचे एक महत्त्व राहिले आहे. याच मैदानावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच नाव संभाजीनगर करा ही पहिली घोषणा केली होती. ही सभा 8 मे 1988 रोजी पार पडली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभा याच ठिकाणी पार पडत असे. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेलाच हे मैदान पूर्ण भरले होते. अशी गर्दी इतर नेत्यांच्या सभेला जमली नव्हती असेही जाणकार सांगतात. सन 2005 मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेदरम्यान अजान झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी अजानला जोरदार विरोध केला होता.
शिवसेनेचा मतदार तुटणार का?
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल सुरू आहे. शिवसेनेची कोंडी करण्याचे वेगवेगळे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलला आहे. मागील काही दिवसात मशिदीवरील भोंग्याचा विषय उपस्थित करत आणि जहाल वक्तव्ये करत राज ठाकरे हे शिवसेनेपेक्षा आता मनसे अधिक हिंदुत्ववादी असल्याचे दर्शवत आहेत. तर, भाजपकडूनही शिवसेनेवर टीका करताना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची आगामी औरंगाबाद येथील सभा ही शिवसेनेच्या राजकीय ताकदीला खिंडार पाडण्यासाठी असल्याचे म्हटले जात आहे.