Mahashivratri 2023: देशभरात महाशिवरात्रीसाठी भाविक विविध तीर्थस्थळावर दर्शनासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान औरंगाबादमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णश्वेर मंदिरासह (Grishneshwar Jyotirlinga Temple) मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंग देवस्थानांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. परळीतील प्रभू वैद्यनाथ (Vaidyanath Jyotirlinga Temple), वेरुळ येथील घृष्णेश्वर आणि औंढा येथील नागनाथाच्या (Aundha Nagnath Temple) दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. गेली तीन वर्षे कोरोनामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांना महाशिवरात्रीसाठी दर्शन घेता आले नव्हते, मात्र यंदा ज्योतिर्लिंग देवस्थानांवर थेट दर्शन होत असल्याने भाविकांमध्येही आनंद पाहायला मिळत आहे.
देशातील एकूण बारा ज्योतिर्लिंगपैकी मराठवड्यात तीन ज्योतिर्लिंग आहेत. ज्यात बीडच्या परळी येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, औरंगाबादच्या वेरुळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर आणि हिंगोली येथील औंढा येथील नागनाथ मंदिराचा समावेश आहे. तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज पहाटेपासून या तिन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. यावेळी हजारो भाविकांनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शन घेतले.
औरंगाबादच्या घृष्णेश्वर मंदिरात गर्दी
देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग औरंगाबादच्या वेरुळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिरात असल्याने याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. तसेच याची जलधारा पूर्व दिशेला असल्याने पूर्ण प्रदर्शना होते. सोबतच घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्यावर बारा ज्योतिर्लिंगचे पुण्य लाभते, अशी भावना असल्याने मराठवाड्यासह देशभरातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी रात्रीपासून वेरुळमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले.
नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची गर्दी
देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठव्या स्थानी असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी भक्तांनी लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली आहे. त्यानंतर दर्शनासाठी नागनाथ मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सुद्धा आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे.
बीड येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात मोठी गर्दी
महाशिवरात्रीनिमित्त बीड येथील ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात मोठी गर्दी होते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने देशातील पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून आणि राज्या बाहेरुन सुद्धा भाविक परळीमध्ये येत आहेत. रात्रीपासूनच दर्शनासाठी लोक रांगेमध्ये लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर यावेळी पोलिसांकडून देखील विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: