औरंगाबाद: मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाच्या होणाऱ्या मेळाव्यासाठी निघालेल्या वाहनांचा औरंगाबादमध्ये अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या दौलताबाद जवळील समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक जाणारी वाहनं एकमेकांना धडकल्याने दहा वाहनांचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला नसतानाही शिंदे गटाकडून नियमांचे उल्लंघन करून वाहनं नेण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.


मुंबईच्या बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. यासाठी मराठवाड्यातील हजारो शिंदे समर्थक मुंबईच्या दिशेने निघाले आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाला. याच ताफ्यातील वाहनांचा औरंगाबादच्या समृद्धी महामार्गावर आल्यावर अपघात झाला. त्यामध्ये 10 चार चाकी गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. 


समृद्धी महामार्गावरून बेकायदा वाहतूक: दानवे 


या अपघातानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे की, समृद्धी महामार्ग अजूनही सर्वसामान्यांसाठी वाहतुकीस खुला झाला नाही. या महामार्गाचे अनेक काम अजूनही अपूर्ण आहे. सर्वसामान्य व्यक्ती या महामार्गावरून गेल्यास त्याला हटकले जाते. परंतु सत्तेचा दुरुपयोग करून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी  बेकायदेशीर वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या लोकांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.


असा झाला अपघात....


उद्या म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली 1500 हून अधिक चारचाकी वाहनं जालना येथून निघाली आहेत. दरम्यान, औरंगाबादच्या दौलताबादजवळील समृद्धी महामार्गवरून जात असतानाच  एका चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर मागून भरधाव वेगाने येणारी नऊ वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


महत्त्वाच्या बातम्या :