Ashok Chavan: माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार घडल्याचं समोर आलं असतानाच, आता असाच काही प्रकार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्याबाबतीत घडला आहे. मंत्रीपदाच्या लेटरहेडचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तींनी बदनामीकारक, बनावट पत्रे तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर याबाबत अशोक चव्हाण यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे आपल्यावर पाळत ठेवली जात असून घातपात घडवण्याचाही प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. 


याबाबत अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच्या काळातील काही शासकीय पत्रे मिळवून, अज्ञात व्यक्तींनी त्यातील सही कायम ठेवून व मूळ मजकूर मिटवून बनावट कोरे लेटरहेड तयार केले असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. याची आपल्याला आधीच कुणकुण लागली असल्याचं चव्हाण म्हणाले. तर फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेडही त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानुसार पोलिसांकडून याची चौकशी देखील सुरु असल्याच चव्हाण म्हणाले. 


माझ्यावर पाळत ठेवली जात आहे...


यापूर्वी फक्त स्वाक्षरी असलेले एक कोरे लेटरहेड मिळाले होते. मात्र, आज अशाच बनावट कोऱ्या लेटरहेडवर मराठा आरक्षणासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले एक खोटे पत्र मिळाल्याने चव्हाण यांनी तातडीने नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची भेट घेऊन याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे. तर आपल्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात असून, सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करतायत. यावरून माझा घातपात घडवण्याचे त्यांचे कारस्थान असावे, असाही गंभीर संशय अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. 


गुन्हा दाखल करण्याची मागणी


तर पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, माझ्या सहीचे बनावट पत्र तयार करण्यात आले आहे, त्याअर्थी पुढील काळात अशाच प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून त्यांचा गैरवापर होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि राजकीय दृष्ट्या मला बदनाम करण्यासाठी व जनतेत गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने हे बनावट दस्तऐवज तयार केले असल्याचा अंदाज चव्हाण यांनी वर्तवला आहे.  तसेच बनावट पत्रे तयार करून विविध समाजात बदनामी करून, सामाजिक शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचाही प्रयत्न असू शकतो, असेही चव्हाण म्हणाले. तर त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra News: धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस भरतीचा प्रकार, बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल