मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाने मंत्रालयात (Manralay) बोगस भरतीचा प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय. बोगस रॅकेट चालवल्याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात एका मंत्रालयातील कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या यशवंत कदम यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजार आणि त्यानंतर कायमस्वरूपी नोकरीसाठी 7 लाख रूपये मागितल्याचा तक्रारीत उल्लेख आहे
धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेतून सेवानिवृत्त झालेले यशवंत लक्ष्मण कदम (67) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. लक्ष्मण कदम हे गोवंडी येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. कदम यांच्या एम.एस.सी. झालेल्या मुलाला नोकरी मिळण्याकरता ते प्रयत्न करत होते. लहान मुलगा रत्नजीत कदम यांने व्हॉट्सॲपवर सरकारी नोकरी संदर्भातील जाहिरात बघून निखिल माळवे याच्याशी संपर्क साधला. माळवे याने त्याला थेट मंत्रालयातील सामाजिक न्याय विभागात लिपीक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला मुलाखतीसाठी 30 हजारांची तर कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी साडे सात लाख रुपयांची मागणी केली.
माळवे याने सोशल मीडियावर धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांच्या कार्यालयाबाहेर काढलेले फोटो सोशल मीडियावर ठेवून विश्वास संपादन केला होता. मुलाच्या भविष्याचा प्रश्न आहे म्हणून कदम पैसै देण्यास तयार झाले. पत्नीचे दागिने गहाण ठेवून कदम यांनी माळवेला 7 लाख 30 हजार रुपये दिले. रत्नजीतला मंत्रालयात मुलाखतीसाठी बोलावून तेथे शुभम मोहिते याच्याशी भेट घालून दिली. मोहितेने मुंडे यांच्या कार्यालयात शिपाई असल्याचे सांगितले. मोहिते व्हॉट्सअप डीपीलाही मुंडेंच्या फोटोचा वापर करत होता.
मंत्रालयात भेटीगाठी झाल्यानंतर कांबळे नावाच्या व्यक्तीला भेटून कागदपत्रे दिली. त्याने कागदपत्रे तपासली. 1 डिसेंबर 2021 रोजी धनंजय मुंडे यांच्या नावाचे बनावट आदेश पत्र रत्नजीतला मेल केले. तात्पुरत्या स्वरूपात निवड झाली असून 29 जानेवारी 2021 पर्यंत सदर कार्यालयात उपस्थित राहून नोकरी आदेश प्राप्त करून सेवेस प्रारंभ करण्यास सांगितल्याचे नमूद होते. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. ठरलेल्या तारखेनुसार, कदम यांचा मुलगा मंत्रालयात गेला. मात्र तेथे शुभमचा फोन नॉट रीचेबल होता. तसेच तो मुंडे यांचेसोबत दौऱ्यावर गेला असल्याचे बहाण्याने करून चालढकल केली. त्यानंतर, निलेश कुडतरकर नावाच्या व्यक्तीने कॉल करून मंत्रालयातील काम 100 टक्के होणार असल्याचे आश्वासन दिले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतरकर विरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे. यामध्ये कुठल्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा सहभाग आहे? याबाबत अधिक शहानिशा सुरू असल्याचे गोवंडी पोलीस करत आहे.