संतापजनक! नात्यातील मुलासोबत पळून गेल्यानं पित्यानेच पोटच्या लेकीची केली गळफास देऊन हत्या, जालन्यातील घटना
Jalna Crime News: विशेष म्हणजे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह पेटवून दिला असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
Jalna Crime News: जालना जिल्ह्यातील (Jalna District) पीर-पिंपळगावात एक संतापजनक घटना समोर आली असून, मुलगी घरात कुणालाही न सांगता नात्यातील मुलाबरोबर पळून गेल्याने जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या लेकीला फाशी देऊन तिची हत्या (Murder) केली आहे. विशेष म्हणजे प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह पेटवून दिला असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या घटनेने जालना जिल्हा हादरला आहे. सूर्यकला उर्फ सुरेखा सरोदे अशी मृत मुलीचे नाव असून, संतोष सरोदे हत्या करणाऱ्या वडिलाचे नाव आहे. सोबतच हत्या करण्यासाठी मदत करणाऱ्या संतोष यांचा भाऊ नामदेव सरोदे याच्यावर देखील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणी सूर्यकला ही तीन दिवसापूर्वी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. दरम्यान अनेक ठिकाणी तिचा शोध सुरु असतानाच, सूर्यकला पुन्हा घरी परतली. घरी आल्यावर तिची विचारपूस केली असता, सूर्यकला एका जवळच्याच नातेवाईकाच्या मुलाबरोबर पळून गेली असल्याचं तिच्या वडिलांना समजलं. त्यामुळे याचा संतोष सरोदेला प्रचंड राग आला.
शेतातून नेऊन घेतला जीव...
आपली मुलगी नात्यातील एका नातेवाईकाच्या मुलासोबत पळून गेल्याने याचा संतोष सरोदेला प्रचंड राग आला होता. त्यामुळे अपमानाच्या भीतीने त्याने मुलीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मुलीला आपल्या शेतात नेले. शेतवस्तीवरील एका कडुलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास देऊन मुलीची हत्या केली. त्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मुलीचा मृतदेह पेटवून दिला. एवढ्यावरच न थांबता तिची राख दोन पोत्यांमध्ये भरून ठेवल्याचं आरोपी पित्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर हत्या करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
आणि गावकऱ्यांना कुणकुण लागली...
सूर्यकलाच्या वडिलांनी आपल्या भावाच्या मदतीने तिचा जीव घेतल्याची कुणकुण गावातील काही लोकांना लागली होती. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. माहिती मिळताच चंदन जीरा पोलिसांनी गावात धाव घेतली. त्यानंतर आरोपी संतोष सरोदे याला ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. तर याचवेळी पोलिसांना मयत मुलीची हत्या करून तिची राख पोत्यात भरून ठेवल्याच दिसलं. त्यामुळे मुलीच्या वडिलासह काकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Aurangabad Crime : स्वयंपाकघरात मिठात पुरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ, नरबळीचा संशय