'पिंगा ग पोरी पिंगा..' पाणी प्रश्नावरून औरंगाबादमध्ये भाजपच हटके आंदोलन
औरंगाबाद शहरातील पाणी ( Aurangabad Water Issue ) प्रश्न गंभीर बनला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.
Aurangabad Water Issue : औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न गेल्या काही दिवसांपासुन चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपकडून सतत आंदोलन केले जात आहे. त्यातच आता शहरातील सिडको परिसरात भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून हटके आंदोलन करण्यात आले. यावेळी संकष्ट चतुर्थीनिमित्ताने गणपती मंदिरात पाण्यावरील गाणी म्हणत रिकाम्या हंड्याचे पूजन आणि आरती करून अनोखं आंदोलन करण्यात आले. तर याचवेळी 'पिंगा ग पोरी पिंगा' या गाण्याच्या माध्यमातून उपस्थित महिलांनी पाणी टंचाईची व्यथा मांडली.
औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न प्रचंड गंभीर होत चालला आहे. अनेक भागात आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकरावर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे याच मुद्यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळत आहे. भाजपकडून आतापर्यंत अनेक आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी शहरातील एन-3 भागात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. भाजपच्या माजी नगरसेविका माधुरी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी संकष्ट चतुर्थीनिमित्ताने गणपती मंदिरात पाण्यावरील गाणी म्हणत रिकाम्या हंड्याचे पूजन आणि आरती करून हटके आंदोलन केलं. तसेच महानगरपालिकेच्या विरोधात गणपतीची विडंबन आरती सुद्धा यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा.....
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी प्रश्नावरून भाजपकडून सतत आक्रमक भूमिका घेतली जात आहे. तर याच मुद्यावरून 23 मी रोजी शहरातील पैठणगेट ते महानगरपालिका कार्यालयापर्यंत भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढण्यात येणार आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार असून यावेळी भाजपचे अनेक महत्वाचे नेते या मोर्च्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून जोरदार तयारी.....
फडणवीस यांच्या नेतृत्वखाली निघणाऱ्या 'जल आक्रोश मोर्चा' यशस्वी करण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे. यासाठी भाजपचे स्थानिक आमदार,माजी नगरसेवक, महत्वाचे नेते यांच्याकडे विविध जवाबदारी देण्यात आली आहे. तर शहरातील वेगवगेळ्या भागात भाजपच्या नेत्यांकडून मोर्च्यासंदर्भात बैठका सुद्धा घेण्यात येत आहे. तसेच मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा लोकांना भाजपकडून केले जात आहे.