Sandipan Bhumre: स्लीप बॉय ते कॅबिनेट मंत्रीपद; भूमरेंच्या आयुष्यात 'एकनाथा'ची साथ प्रत्येक टप्प्यावर
Aurangabad News: स्लीप बॉय म्हणून ज्या कारखान्यात भुमरे यांनी काम केले त्याचे नाव सुद्धा संत एकनाथ साखर कारखाना आहे.
Aurangabad News: साखर कारखान्याचे स्लिप बॉय ते पाचवेळा आमदार आणि आता कॅबिनेट मंत्री असलेले संदीपान भुमरे यांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भुमरे यांच्या राजकीय करिअरमध्ये प्रत्येक टप्प्यात 'एकनाथ' नावाची साथ मिळाली.
दरवेळी 'एकनाथा'ची साथ...
भुमरे यांचे मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. त्यामुळे भुमरे नाथ भक्त आहे. आपल्यावर नेहमीच नाथांचे आशीर्वाद असल्याचे भुमरे म्हणतात. त्यांनतर त्यांनी स्लीप बॉय म्हणून ज्या कारखान्यात काम केले त्याचं नाव सुद्धा संत एकनाथ साखर कारखाना आहे. त्यांनतर त्याच संत एकनाथ साखर कारखान्यात ते चेअरमन झाले. पुढे कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले. आता त्यांच्या राजकीय करिअरमध्ये पुन्हा एका एकनाथाने एन्ट्री केली आहे. त्यामुळे ज्या-ज्यावेळी भुमरे यांच्या आयुष्यात 'एकनाथा'ची एन्ट्री झाली त्यांना मोठ यश मिळाल्याचं त्यांचे कार्यकर्ते दावा करतायत.
ग्रामपंचायत सदस्य पासून सुरवात...
गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत एकनिष्टने काम करणारे भुमरे यांची एकनिष्टेवर कधीच कुणीही संशय करू शकत नव्हता. पैठण तालुक्यातील पाचोड गावातील ग्रामपंचायत सदस्य पासून त्यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरवात केली. दरम्यानच्या काळात संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम करत त्यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा ओढाला. घरची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी शिवसेनेची साथ सोडली नाही. त्यांच्या हाच एकनिष्ठपणा पाहता पक्षाने 1995 साली त्यांना विधानसभेत उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवला. त्यांनतर 2009 ची विधानसभा निवडणूक वगळता आजवर ते या मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत.
बंडखोरीवर कार्यकर्ते म्हणतात...
भुमरे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आपण भुमरे साहेब यांच्यासोबत असल्याच दावा केला आहे. तर संपूर्ण तालुक्यात अशीच काही परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी भुमरे यांच्या समर्थनात होर्डिंग सुद्धा लागले आहे. त्यामुळे सद्यातरी पैठणमध्ये शिवसैनिकांनी भुमरे यांच्यासोबत उभे राहणे पसंद केले असल्याचे दिसत आहे.