Aurangabad: वडिलांच्या बंडावर सत्तार यांचे पुत्र म्हणतात, आम्ही तर....
Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत राहणार असल्याचे अब्दुल समीर म्हणाले.
Maharashtra Political Crisis : शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आरोप-प्रत्यारोप सुद्धा केली जात आहे. अशावेळी बहुतांश बंडखोर आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. दरम्यान शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांनी आपल्या वडिलांनी केलेल्या बंडखोरीवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. सिल्लोड येथ आज अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली अब्दुल सत्तार यांच्या समर्थनात भव्य अशी रॅली काढण्यात आली होती
काय म्हणाले सत्तार यांचे पुत्र...
माध्यमांना प्रतिक्रीया देतांना सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर म्हणाले की, कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी जे काम महाराष्ट्रात केलं, जीव धोक्यात घालून त्यांनी लोकांना मदत केली. त्या काळात आम्हाला सुद्धा शिंदे यांनी पाठबळ दिले. आम्ही जेव्हा शिवसेनेत गेलो त्यावेळी एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांची कार्यशैली पाहून आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवूनच अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असतील तर त्यांच्या पाठीमागे अब्दुल सत्तार शंभर टक्के उभे असणार. महाविकास आघाडीमधील घटकपक्ष आणि इतर पक्ष ज्याप्रमाणे शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे कधी झाले नव्हते. ते पक्षश्रेष्ठींना कळावे म्हणून आज ही रॅली काढण्यात आली असल्याच सत्तार यांचे पुत्र समीर म्हणाले.
सिल्लोडमध्ये शक्तिप्रदर्शन....
आज सकाळी 10 वाजता सिल्लोड येथील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत रॅलीची सुरवात केली. त्यानंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय येथून प्रत्यक्षात रॅलीला सुरुवात झाली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे संपर्क कार्यालय ते प्रियदर्शनी चौक अशी रॅली मार्गस्थ होणार असून प्रियदर्शनी चौक येथे रॅलीचे सभेत रूपांतर होवून सभेनंतर रॅलीचा समारोप करण्यात आले. सत्तार यांच्या समर्थनात आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा म्हणून ही रॅली काढण्यात आली होती.