Aurangabad News: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार पार पडला असला तरीही खातेवाटपाचा निर्णय अजूनही झालेला नाही. अशातच आता पालकमंत्री पदासाठी नवनिर्वाचित मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर आता तीन आमदारांनी दावा केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री पदाची जवाबदारी कुणाच्या खांद्यावर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण...
15 ऑगस्ट निमित्ताने जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते केले जाते. मात्र अजूनही खातेवाटपाचा आणि पालकमंत्री पदाचे निर्णय न झाल्याने, प्रशासनाने नवनिर्वाचित काही मंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याबाबत आदेश काढले आहेत. त्याप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे ध्वजारोहण संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे पालकमंत्री पदही त्यांच्याकडेच असणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
भुमरे ध्वजवंदनापुरतेच: अब्दुल सत्तार
एकीकडे भुमरे यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण होणार असतांना सिल्लोडचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी वेगळाच दावा केला आहे. भुमरे ध्वजवंदनापुरतेच असणार आहेत. कारण मुख्यमंत्री यांनी संदिपान भुमरे यांना फक्त ध्वजारोहणाची जबाबदारी दिली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकतर माझ्याकडे ही जबाबदारी देतील, नाहीतर भुमरेंकडे देतील. तसेच अजून दुसऱ्या कुणाकडे सुद्धा ही जवाबदारी दिली जाऊ शकते. मात्र आम्हाला मुख्यमंत्री यांचा निर्णय मान्य असल्याच सत्तार म्हणाले आहे.
पालकमंत्रीपदासाठी शिरसाट यांच्याही दावा...
एकीकडे भुमरे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट निमित्ताने जिल्ह्याचे मुख्य ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना, दुसरीकडे मलाही पालकमंत्री केले जाऊ शकते असा दावा सत्तार यांनी केला आहे. त्यातच औरंगाबादच्या पालकमंत्री पदासाठी आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा दावा केला आहे. पहिल्या मंत्रिमंडळात मला संधी मिळाली नसली तरीही दुसऱ्यावेळी संधी मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण कॅबिनेट मंत्रीपदासह पालकमंत्रीपदही मागितले असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे.
अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील...
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक शिवसेना आमदारांनी शिंदे यांच्या बंडात सहभाग नोंदवला होता. त्यात भुमरे पक्षातील जुने नेते असून, कॅबिनेट मंत्रिपद सोडून ते शिंदे यांच्यासोबत आले होते. सत्तार यांनी राज्यमंत्रीपद सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बंडात त्यांची महत्वाची भूमिका होती. तर शिरसाट हे शिंदे यांचे जवळचे नेते असून, बंडामध्ये सर्वात आधी त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यामुळे तिन्ही लोकं महत्वाचे असल्याने मुख्यमंत्री औरंगाबादच्या पालकमंत्रीपद कुणाला देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: कॅबिनेटसोबतच पालकमंत्रीपदही हवं; शिरसाटांच्या भूमिकेने 'भुमरे समर्थक' गोंधळात