Aurangabad News: शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होऊन चार दिवस उलटत नाही, तो औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या एका ट्वीट करत 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख केला. परंतु हे ट्वीट चुकून फॉरवर्ड झाल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला. मात्र याचवेळी त्यांनी आपण कॅबिनेट मंत्रीपदाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली मागणी कायम असून, सोबतच पालकमंत्री पदाचीही आपण मागणी केली असल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या याच विधानामुळे पालकमंत्रीपदाचे दावेदार संदिपान भुमरे यांच्या समर्थक मात्र गोंधळात पडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण कॅबिनेट मंत्रीपद आणि पालकमंत्री पदाची मागणी केली असल्याचे शिरसाट म्हणाले आहेत. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजी औरंगाबादचे मुख्य ध्वजारोहण संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्याचे आदेश सरकारने काढले आहे. भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा निर्णय म्हणजेच भुमरे औरंगाबादचे पालकमंत्री निश्चित असल्याचा दावा भुमरे समर्थकांकडून केला जात आहे. मात्र आता शिरसाट यांनी सुद्धा पालकमंत्री पदासाठी दावा केला असल्याने, 'भुमरे समर्थक' गोंधळात पडले आहे.
मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलायं...
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात माझा नंबर लागला नसला तरीही, दुसऱ्या टप्प्यात मला संधी मिळणारच असल्याच शिरसाट म्हणाले आहे. माझं मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलणं झालं असून, त्यांनी मला शब्द दिला आहे. सुरवातीला मी नाराज झालो होतो, पण शिंदे साहेबांनी माझी नाराजी दूर केली आहे. आम्ही त्यांच्यासोबत असून, त्यांना आमचा पाठींबा कायम असणार असल्याचं शिरसाट म्हणाले.
'त्या' ट्वीटमुळे गोंधळ...
शिरसाट यांना मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. तर मंत्रिपदाच्या विस्ताराच्या आदल्या दिवशी रात्री शिरसाट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अशातच 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करत शिरसाट यांनी ट्वीट केल्याने एकच गोंधळ उडाला. तर शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र पत्रकार परिषद घेऊन, टेक्नीकल चुकीमुळे मार्च महिन्यातील ट्वीट आता फॉरवर्ड झाला असल्याचा खुलासा शिरसाट यांनी केला. तर माझ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूर्ण विश्वास असल्याचं शिरसाट म्हणाले आहे.