Aurangabad News: राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असल्याने धरणात होणारी आवक सुद्धा मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. दरम्यान आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडीतही ((Jayakwadi Dam) पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे एकूण 18 दरवाजे उघडून पाण्याची आवक वाढवण्यात आली आहे. सद्या जायकवाडीतून एकूण 39 हजार 917 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. तर धरणात सद्या 34 हजार 914 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे एकूण 18 दरवाजे उघडून 2 फुट उंचीवरून पाणी सोडण्यात येत आहे. उघडण्यात आलेल्या दरवाज्यातून 37 हजार 728 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सोबतच जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 क्युसेक व उजव्या कालव्यातून 600 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे एकूण 18 दरवाजे, जलविद्युत केंद्र आणि उजव्या कालव्यातून एकूण 39 हजार 917 क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात येत आहे.
सद्याची परिस्थिती...
- पुर्ण संचय पातळी (FRL) : 1522.00 फुट
- सध्याची पाणी पातळी (WL) : 1521.17 फुट
- जिवंत पाणी साठा (Live) : 2071.824 दलघमी (73.16 टिएमसी)
- एकुण पाणी साठा (Gross) : 2809.930 दलघमी (99.22टिएमसी)
- पाण्याची आवक (Inflow): 34914 क्युसेक
- पाण्याचा विसर्ग (Discharge) : सांडव्याद्वारे 37728 क्युसेक, जलविद्युत केंद्रातून1589 क्युसेक, उजव्या कालव्यातून 600 क्युसेक
- एकुण विसर्ग: 39917 क्युसेक
गावकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी काठच्या गावांना धोका निर्माण होतो. त्यामुळे या गावातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच जनावरे आणि इतर काही गोष्टी घेऊन नदी पात्रात उतरण्याचा धाडस सुद्धा कुणीही करू नयेत असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच रात्रीपासून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला असल्याने गोदावरी नदीचे पात्र भरून वाहत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
Vinayak Mete : अपघातानंतर तासभर विनायक मेटे यांना मदतच मिळाली नाही अन् होत्याचं नव्हतं झालं!